बातम्या

बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार..?

Bachu Kadu will come out of the Mahayutia


By nisha patil - 3/23/2024 5:46:19 PM
Share This News:



मुंबई - अमरावती मतदारसंघाचा तिढा सुटण्यापेक्षा आता वाढताना जास्त दिसतोय. प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. वेळ पडली तर आपण युतीतून बाहेर पडू. प्रहार पक्षाचा उमेदवार अमरावती लोकसभेला उभा करु. पण नवनीत राणा यांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आता आम्ही अडचणीत येतोय, असं वाटतंय”, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांची ही भूमिका भाजप आणि महायुतीसाठी धोक्याचा इशारा आहे. बच्चू कडू यांचा अमरावतीत मोठा चाहता वर्ग आहे. तसेच सर्वसामान्य नागरीक बच्चू कडू यांच्या शब्दाचा मान ठेवतात. त्यामुळे बच्चू कडू यांनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर त्याचा मोठा फटका महायुतीला बसू शकतो.

“नवनीत राणा यांना आमचा पाठिंबा अजिबात राहणार नाही. अशा परिस्थितीत पाठिंबा अजिबात राहणार नाही. ही जी स्थिती निर्माण केलेली आहे यामध्ये मानसिकता नाहीच. वेळ आली तर युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ”, अशी टोकाची भूमिका बच्चू कडू यांनी घेतली. “अमरावती लोकसभामतदारसंघात माझे दोन आमदार सोडून किमान एक लाख मते त्या भागात आहेत. खरा दावा तर आम्हीच करायला पाहिजे होता. पण आम्ही प्रामाणिकपणे काम करणं हे थोडं अंगलट येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आम्ही थोडं अडचणीत येतोय, असं वाटायला लागलं आहे”, असं बच्चू कडू म्हणाले.

“वेळ आली तर आम्ही लोकसभेसाठी उमेदवारी देवूच. त्यांनी तोडायची सुरुवात केली आहे तर आम्ही तोडवू. आम्हालाही वाईट वाटतंय. युतीतून बाहेर जायचं नाही, असं आम्हालाही वाटतंय. पण तुम्हाला ठेवायचंच नाही तर आम्ही एवढे काही गुलाम नाहीत. आम्ही एवढे लाचारही नाहीत”, अशी टोकाची भूमिका बच्चू कडू यांनी मांडली.


बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार..?