बातम्या

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे संस्थापक बाळासाहेब गायकवाड यांचे निधन

Balasaheb Gaikwad founder of Kolhapur District Rashtriya Talim Sangh


By nisha patil - 6/2/2024 10:31:17 PM
Share This News:



 कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे संस्थापक बाळासाहेब  गायकवाड  यांचे निधन 

कोल्हापूर( प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे संस्थापक व असंख्य कुस्तीगिराचे मार्गदर्शक वस्ताद बाळ गायकवाड यांचे वयाच्या ९० व्यावर्षी निधन झाले. सन १९६०च्या दरम्यान माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे व बाळ गायकवाड यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना करून कुस्तीगीरांचे संघटन करून पैलवान आणि तालमींना कुस्ती पेशा वाढविण्यासाठी सहकार्य केले. 

    आजही बाळ दादा हे कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे चीफ पेट्रन म्हणून कार्यरत होते. १९७० ते १९८५ सालापर्यंत पश्चिम महाराष्ट्रामध्ये असंख्य कुस्तीगरांच्या या संघटनेचा प्रचंड मोठा गोतावळा व आदर युक्त दबदबा होता.  त्यांचे समवयस्क हिंदकेसरी गणपत आंदळकर मारुती माने यानाही कुस्ती बाबत त्यांचे मार्गदर्शन असायचे त्याचबरोबर हिंदकेसरी चंबा मुतनाळ दादू चौगुले विष्णू जोशीलकर निग्रो बंधू यांच्यासह आज अखेरच्या अनेक नामांकित मल्लांना त्यांचे कुस्ती साठी व्यायामापासून आहारापर्यंत सर्व मार्गदर्शन असायचे.१९७७ च्या दरम्यान उत्तरे कडील विशेष करून गुरु हनुमान सिंग यांच्या पैलवानांचे कोल्हापूरकरांना कुस्तीसाठी वारंवार आव्हान असायचे कोल्हापूरकरांच्या बरोबर बाळ दादानाहीही मोठी बोचणी होती. म्हणून त्यांनी अतिशय लहान वयामध्ये कोपार्डे येथील लहान शाळकरी मुलगा युवराज पाटील यांना आणून आपल्या स्वतः बरोबर ठेवून एक महाबली पैलवान तयार केला आणि उत्तरेकडील मल्लांचे आवाहन परतवून लावले आणि भारताचा सर्वश्रेष्ठ मल्ल युवराज पाटीलच हे सिद्ध केले आणि लोकांनीच युवराज पाटील यांना भारत देशामध्ये कोणीच प्रतिस्पर्धी मल्ल राहिला नाही म्हणून ।कुस्ती सम्राट ' 'ही पदवी लोकांनीच दिली.
 

बाळ गायकवाड यांनी घरदार संसार या पासून दूर राहून व विवाहित राहून सदैव तालीम संघामध्येच वास्तव्य ठेवून आपले सर्वस्व कुस्तीसाठी वाहून घेतले त्यामुळे त्यांना कुस्तीचे भीष्माचार्य म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
 

तात्कालीन खासदार उदयसिंगराव गायकवाड 'बाळासाहेब माने व अनेक लोकप्रतिनिधींनी बाळ गायकवाड यांच्यासाठी भारत सरकारने द्रोणाचार्य पुरस्कार 'दादोजी कोंडदेव पुरस्कार इत्यादी अनेक शासकीय पुरस्कार स्वीकारण्याची विनंती केली अगदी विशेष कार्यकारी दंडाधिकारी पद सुद्धा स्वीकारण्याची विनंती केली त्यासाठी तुम्ही लायक आहातच त्यामुळे तुम्ही ते स्वीकारले पाहिजे असे तालीम संघात येऊन सुद्धा अगदी मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी आग्रह केला पण तो त्यांनी नम्रपणे नाकारला व कोणत्याही प्रसिद्धीपासून ते अलिप्त राहिले हे उदाहरण अलीकडच्या काळात फार दुर्मिळ आहे.
नेहमी तालीम संघाच्या कार्यालयात वास्तव्यास असणाऱ्या बाळ दादाना आता दगदग नको म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी पुनाळ या त्यांच्या जन्म गावी जबरदस्तीने घेऊन गेले पण तेथेही ते घरी न राहता कुटुंबाचा त्याग करून शेती आणि गुन्हाळ घरावरच राहून कुस्तीचे मार्गदर्शन करत होते त्याचबरोबर शेतीतील पिकांची वेगवेगळे प्रयोग करून शेती करत होते.

 

कालच म्हणजे सोमवारी सकाळी अशक्तपणामुळे त्यांना दवाखान्यात ऍडमिट केले होते. त्यांची तब्येत खडखडीत होती पण वार्धक्यामुळे त्यांच्यावर उपचार करणे शक्य नव्हते. 
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ आणि राज्य आणि देशातील असंख्य मल्ल एका कुस्ती मार्गदर्शकास मुकली आहेत.
   

  कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे संस्थापक बाळ गायकवाड यांच्या निधनाची शोकसभा गुरुवार  ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४  वाजता मोतीबाग तालीम हॉल गुरु महाराज वाड्याजवळ मंगळवार पेठ कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे.


कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे संस्थापक बाळासाहेब गायकवाड यांचे निधन