बातम्या

राज्यात येत्या काळात ५ लाख उद्योजक तयार करण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे- अध्यक्ष, नरेंद्र अण्णासाहेब पाटील

Banks should cooperate to create 5 lakh entrepreneurs in the state


By nisha patil - 8/31/2024 11:54:34 PM
Share This News:



 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून ठरविण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करीत राज्यात १ लाख मराठा उद्योजकांना बँक कर्ज व्याजाचा परतावा देण्यात आला. आता राज्यात येत्या काळात ५ लाख मराठा उद्योजक बनविण्यासाठी बँकांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी केले. महामंडळाच्या मार्फत जिल्ह्यातील सर्व मराठा उद्योजकांपर्यंत ही व्याज परतावा योजना पोहचावी व राज्यात अजून मराठा उद्योजक घडावेत या उद्देशाने जिल्हास्तरीय संकल्पपूर्ती लाभार्थी मेळावा रामकृष्ण मंगल कार्यालय, मेनन आणि मेनन जवळ, मार्केट यार्ड कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केला होता. यावेळी प्रमुख अथिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, कौशल्य विकास विभागाच्या अधिकारी संगीता खंडारे, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच महिला पुरुष लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज व स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन व दीपप्रज्वालनाने झाली. यावेळी बोलताना नरेंद्र पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व लाभार्थी उद्योजकांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, राज्यात सर्वात चांगले काम कोल्हापुरात झाले आहे. या योजनेतून शेतकरी लाभार्थी, डोंगराळ भागातील लाभार्थी, ग्रामीण भागातील युवकांनी लाभ घेतला. सामान्य लोकांना कर्ज मिळावे म्हणून ही योजना सुरू करण्यात आली होती. आत्तापर्यंत ८५०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करणे ही छोटी गोष्ट नाही. यामुळे कित्येक मराठा युवक आज उद्योजक झाले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामंडळाला पुन्हा जीवित केले महामंडळाची पुनर्रचना केली. आम्ही तरुणांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी गाव, तालुके, जिल्हे फिरलो. आर्थिक मागास मराठा युवकांना खऱ्या अर्थाने महामंडळातून संजीवनी मिळाली असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. 

 कोरोना मध्ये या योजनेतील उद्योजक खचला नाही. त्या काळातही महामंडळाने व्याज परतावा दिला. अलीकडील काळात खूप महत्त्वपूर्ण बदल करुन महामंडळ अधिक सक्षम झाले आहे. सर्व बँकांचे नरेंद्र पाटील यांनी आभार मानले. तसेच सहकारी बँकांनी चांगले काम केल्याबद्दल विशेष कौतुक केले. लोकांना व्यवसायात जोडण्याचे कार्य करा असे आवाहन त्यांनी उद्योजकांना केले. हे महामंडळ राज्यात सर्वात चांगल्या पद्धतीने सुरु असून राज्यातील गावागावात हे महामंडळ पोहचवण्याचं काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत १,०३,३६६ लाभार्थी झाले असून, ८६८० कोटी रुपये विविध बँकानी कर्ज वितरित केले आहे. व त्यापैकी महामंडळाने ८६० कोटी रुपये व्याज परतावा केला आहे. या योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात १५,०८० लाभार्थ्यांना १३३६ कोटी रुपयांचे कर्ज बँकांनी वितरित केले आहे. त्यापैकी महामंडळाने १४९ कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा व्याज परतावा केला आहे.

     

महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मंत्री, शासनाच्या विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीयकृत बँका, खाजगी सहकारी बँकांचे प्रमुख, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी- कर्मचारी, लोकप्रतिनिधी, लाभार्थी यांचे तसेच अन्य संबंधितांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

 खासदार धनंजय महाडिक यांनी मराठा समाजातील आर्थिक मागास घटकला मदत करण्यासाठी अलीकडील काळात या महामंडळाची पुनर्रचना केल्याचे सांगून अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी खऱ्या अर्थाने महामंडळाला गती दिल्याचे सांगितले. यातून आज १ लाख युवक रोजगार देणारे झालेत, स्वतःचा परिवार आणि रोजगार दिलेल्या कुटुंबाचाही फायदा करुन देणारे उद्योजक तयार झाल्याचे त्यांनी सांगितले. सद्या लोकहिताचे निर्णय घेत अनेक योजना राज्यात सुरु आहेत, असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. 

 

या मेळाव्यात बँक ऑफ इंडिया, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक, राजे विक्रमसिंह घाटगे को. ऑप. बँक, कुणबी सहकारी बँक तसेच जनता सहकारी बँक आजरा यांचा कर्ज वितरणातील सहभागाबद्दल सन्मान करण्यात आला. लाभार्थी जाई पाटील, सागर पाटील, अनुज दळवी, प्रणिता डकरे, अश्विनी पाटील, संदीप पट्टेकरी, अनिता पाटील, स्वप्नील लोंढे, युवराज कुथळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला. यावेळी वसंतराव मुळीक, एमपी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ऋषिकेश अंग्रे, जिल्हा समन्वयक यांनी प्रास्ताविक केले तर आभार सतीश माने यांनी मानले.


राज्यात येत्या काळात ५ लाख उद्योजक तयार करण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे- अध्यक्ष, नरेंद्र अण्णासाहेब पाटील