बातम्या

काळजी घ्या, कोणत्याही वयात होऊ शकतो रक्तदाबाचा त्रास

Be careful blood pressure can happen at any age


By nisha patil - 11/25/2023 7:14:26 AM
Share This News:



 ३५-४० वर्ष वयाच्या रुग्णांत आढळून येणाऱ्या रक्तदाबाला आता वयाचे बंधन राहिलेले नाही. नुकत्याच झालेल्या तपासणीत दहा ते वीस वयोगटातील तरुणाईलाही रक्तदाबाने ग्रासल्याचे सामोरे आले आहे. विशेष म्हणजे पूर्वी शहरातच हा त्रास मोठ्याप्रमाणात दिसून येत होता. मात्र, आता ग्रामीण भागात अनेकजण रक्दाबाच्या त्रासाने ग्रस्त असल्याचे आढळून येत आहे.

उच्च रक्तदाब हा एक शहरी आजार मानला जातो. परंतु ग्रामीण भागातील लोकांमध्येही उच्च रक्तदाबाची समस्या असल्याचे समोर आले आहे. आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ग्रामीण भागातील नागरिकांच्या सर्वेक्षणात २९ टक्के लोकांचा रक्तदाब वाढल्याचे दिसून आले. यामध्ये तरुणाईचा असलेला समावेश चिंताजनक आहे. शारीरिक काम कमी आणि बौद्धिक काम असल्याने लोकांमध्ये ताण वाढतोय. या वाढत्या ताणामुळे हृदयावर भार पडत आहे. तर लहान वयात मुलांना मधुमेह होतोय शिवाय तरुण वयात हृदयविकार होण्याची दाट शक्यता असते. याकरता प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. नियमित ४५ मिनिटे व्यायाम करावा, चालण्याचा व्यायाम अतिशय उत्तम. आणि मसालेदार व तेलकट पदार्थ खाणे टाळावे.

राज्य शासनाच्या ग्रामीण आरोग्य यंत्रणेने ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची माहिती संकलित केली आहे. ती संकलित करत असताना काही गावांची निवड करून तिथल्या घराघरात जाऊन स्थानिकांकडून जागतिक आरोग्य संघटनेने तयार केलेली प्रश्नावली भरून घेण्यात आली. तसेच प्रत्येक सहभागी व्यक्तीचा रक्तदाब मोजण्यात आला. यामध्ये एकूण तपासणी केलेल्या लोकांपैकी २९ टक्के लोकांचा रक्तदाब वाढल्याचे दिसून आले. त्यात ४९ टक्के पुरुष व २१ टक्केस्ञीयांचा समावेश होता. नवीन आढळून आलेल्या २९ टक्के रुग्णांमध्ये २० वर्षाच्या आतील रुग्णांचा असलेला समावेश चिंताजनक आहे.


काळजी घ्या, कोणत्याही वयात होऊ शकतो रक्तदाबाचा त्रास