बातम्या
सतत शिकण्याची आणि नवीन गोष्टी शोधण्याची प्रेरणा घ्या: प्रा. डॉ. आर. व्ही. गुरव
By nisha patil - 6/4/2024 6:55:35 PM
Share This News:
कोल्हापूर: ५ एप्रिल २०२४: शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र अधिविभागाने आयोजित एम.एस्सी. भाग २ चा (२०२२-२०२४) साठीचा निरोप समारंभ उत्साहाने संपन्न झाला. या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
सुरवातीस गंगावती सुतार, अनिरुद्ध पुरोहित, सिद्धी पाटील, तुषार सुतार या विद्यार्थ्यांनी त्यांचे अधिविभागातील विविध प्रसंग तसेच त्यांना आलेले अनुभव मनोगतातून व्यक्त केले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. आर. व्ही. गुरव, अधिविभागप्रमुख वनस्पतीशास्त्र अधिविभाग हे लाभले.
डॉ. गुरव यांनी विद्यार्थ्यांना "बदलत्या जगात विज्ञान आणि शिक्षणाची भूमिका" या विषयावर मार्गदर्शनपर भाषण केले. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सतत शिकण्याची आणि नवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाशी अपडेट राहण्याची प्रेरणा दिली. तसेच वेळेचे नियोजन करून अभ्यासासाठी पुरेसा वेळ द्या, विविध पुस्तके आणि लेख वाचून स्वतःला अपडेट ठेवा आणि समाजासाठी योगदान देण्यासाठी प्रयत्नशील रहा याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच शिक्षण आणि परीक्षा, सोशल मीडियाचा प्रभाव, शिक्षकांची भूमिका आणि व्यक्तिमत्व विकास यांसारख्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात अधिविभागप्रमुख प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गुणांबद्दल मार्गदर्शन केले. अधिविभागाची परंपरा, अधिविभागातील शिक्षकांचे योगदान, संशोधनातील विभागाचे स्थान या विषयांवर प्रकाश टाकला. तसेच लवकरच सर्व माजी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीमध्ये बैठक घेणार असल्याची माहिती दिली. अदिती गुरव या विद्यार्थिनीने आभार मानले.
श्रुती खराडे आणि साधना परीट यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी, प्रा. डॉ. के. वाय. राजपुरे, डॉ. ए. व्ही. मोहोळकर, डॉ. आर. एस. व्हटकर, डॉ. एन. एल. तरवाळ, डॉ. एम. व्ही. टाकळे, डॉ. एस. पी. दास, डॉ. व्ही. एस. कुंभार, डॉ. यु. एम. चौगुले, डॉ. ए. आर. पाटील, डॉ. एस. एस. पाटील यांच्यासह अधिविभागातील विद्यार्थी उपस्थित होते.
सतत शिकण्याची आणि नवीन गोष्टी शोधण्याची प्रेरणा घ्या: प्रा. डॉ. आर. व्ही. गुरव
|