बातम्या

केवळ शिक्षित होण्यापेक्षा कुशल व्हावे – मिलिंद बावा

Be skilled rather than just educated Milind Bawa


By nisha patil - 12/2/2024 11:21:23 PM
Share This News:



केवळ शिक्षित होण्यापेक्षा कुशल व्हावे – मिलिंद बावा
डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये तीन दिवसीय "टेक्नोत्सव’ चा शुभारंभ 

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यानी केवळ शिक्षित होण्यापेक्षा कुशल होणे आवश्यक आहे. कोणत्याही गोष्टीचे अर्धवट  किवा वरवरचे ज्ञान  हे खूपच धोकादायक  असून आपण जे क्षेत्र निवडले आहे त्याचे परिपूर्ण ज्ञान मिळवावे. ‘टेक्नोत्सव’ मुळे  विद्यार्थ्यांमधील अभियांत्रिकी व तांत्रिक कौशल्य यासाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे प्रतिपादन प्राज इंडस्ट्रीज पुणेचे जॉईट जनरल मॅनेजर मिलिंद बावा यांनी केले.

 डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित तीन दिवसीय "टेक्नोत्सव २०२४" या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बावा बोलत होते.  ते पुढे म्हणाले, आपल्या आयुष्यातील हि  चार वर्षे  म्हणजे एक सुवर्णसंधी म्हणून पाहिले पाहिजे. या काळात केवळ शिक्षण न घेता ज्ञान आणि  आभियांत्रिक व तांत्रिक कौशल्ये आत्मसात करा. आपली कल्पकता व  सृजनशीलता यांचा योग्य वापर करा. आपल्या जीवनामध्ये असे काही करा की आपल्या पालकांना आपला अभिमान वाटला पाहिजे.  शाश्वत विकास फार महत्त्वाचा असून त्यासाठी आपले ध्येय आजचा निश्चित करून त्या दिशेने वाटचाल करा.  आयुष्यात यशस्वी होण्यासाठी भावनांवर विजय मिळवणे संवाद कौशल्य आत्मसात करणेही तेवढेच महत्वाचे आहे. 
   
 प्राचार्य डॉ.  संतोष चेडे यांनी, शिक्षणाचा मूलभूत हेतू काय याबाबत मार्गदर्शन केले. टेक्नोत्सव  सारख्या  उपक्रमांमधून क्रिएटिव्हिटी आणि आंतरशाखीय संशोधनाला चालना मिळेल. मात्र, केवळ उत्तम नवकल्पना आणि सर्जनशीलता असून उपयोग नाही तर ती ओळखून त्याचे व्यावसायिकीकरण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यानी सांगितले.

   टेक्नोत्सव २०२४चे समन्वयक डॉ. के. टी. जाधव  म्हणाले, विद्यार्थ्यांचा अंगभूत कलागुणांना वाव देणे व आधुनिक तंत्रज्ञान वापरून विविध सामाजिक, पर्यावरण पूरक समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात येथील विविध संस्थेचे विद्यार्थ्यानी या  स्पर्धेत सहभाग घेतला आहे. 

विध्यार्थी समन्वयक  अलीशिबा घाटगे आणि शिवदत्त मिरजकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे केमिकल विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. पाटील, ‘मौरीटेक’चे गौरव कोळी, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, कॅम्पस टी. पी. ओ. सुदर्शन सुतार,  अधिष्ठाता (संशोधन) डॉ. अमरसिंह जाधव, अधिष्ठाता (शैक्षणिक) डॉ. बी.डी जितकर, सह समन्वयक डॉ. मनीषा भानुसे, विभाग प्रमुख, प्राध्यापक,  सहभागी विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए.के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


केवळ शिक्षित होण्यापेक्षा कुशल व्हावे – मिलिंद बावा