राजकीय

वडिलांच्या वैद्यकीय बिलाचे पैसे वसूल करणाऱ्या प्रवृत्तीचा पराभूत करा - भारती पवार

Beat the tendency to collect money for fathers medical bills


By nisha patil - 11/15/2024 11:11:49 AM
Share This News:



वडिलांच्या वैद्यकीय बिलाचे पैसे वसूल करणाऱ्या प्रवृत्तीचा पराभूत करा - भारती पवार 

राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ जाधववाडीत महिला मेळावा

कोल्हापूर: स्वतःच्या वडिलांचे लाखो रुपयांचे वैद्यकीय बिल शासनाकडून वसूल करणाऱ्या उमेदवाराला येत्या वीस तारखेला जोराचा झटका देऊन घरी बसवा असे आवाहन भारती पोवार यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ जाधववाडी येथे झालेल्या महिल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, या नेत्याचे कारनामे सांगावे तेवढे कमी आहे. माता-भगिनींसाठी घेतलेल्या महोत्सवामध्ये भेट देण्यासाठी आणलेल्या टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन अशा वस्तू कशा आणि कुणाकडून आणल्या याची चर्चा सर्वत्र होते आहे.

ज्या लोकप्रतिनिधीवर शेजाऱ्यांना मारहाण केल्याची तक्रार होते त्यांना सभ्य आणि सुज्ञ जनता साथ देणार नाही. सर्वांच्या जिव्हाळ्याच्या आणि कलाकारांच्या अस्मितेचा प्रश्न असणाऱ्या जयप्रभा स्टुडिओबाबत झालेला वाद जनता अद्याप विसरली नाही. यांचेच चिरंजीव कंत्राटदार, तरी शहरात विरोध झाल्यावर करण्यात आलेल्या आंदोलनात हेच पुढे! या जागेच्या बदल्यात शासनाकडून घेतलेल्या जागेचा टीडीआरची मागणी करणारा सुध्दा हेच. प्रत्येक गोष्टीत आर्थिक स्वार्थ पाहणाऱ्या प्रवृत्तीला जनतेने आता पराभूत करावे लागेल. शासनाने केशवराव भोसले नाट्यगृहासाठी दिलेल्या निधी मध्ये ढपला पाडला जाऊ नये यासाठी व चांगली वास्तू पुन्हा उभारण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांना जनतेने साथ द्यावी असे आवाहन त्यांनी केले. धनशक्तीचा कितीही वापर केला तरी क्षीरसागर यांचा पराभव अटळ आहे असे पवार म्हणाल्या.

उपस्थित राहणार संबोधित करताना राजेश लाटकर म्हणाले, महायुतीने महिलांना काय दिले? हा प्रश्नच आहे. महिला सबलीकरणाच्या गप्पा मारतात पण बदलापूरच्या घटनेत सरकारने काय केले, संबंधितांनी कशी वागणूक व काय न्याय दिला हे साऱ्या राज्याने पाहिले. इतके होऊनही त्यांचेच नेते महिलांच्या बाबत उद्धट प्रतिक्रिया देऊनही त्यांना क्लीन चिट मिळते ही शरमेची बाब आहे. महागाईचे कोणतेही सोयरसुतक महायुती सरकारला नाही. १०० रुपयांचा स्टँप ५०० रुपये झाला, जीवनाश्यक वस्तूंचे दर दिवसेंदिवस वाढत आहे, खाद्य तेल, गॅसच्या किमती वाढत आहेत.

या सरकारचा पराभव करण्यासाठी वीस तारखेला प्रेशर कुकर या चिन्हापुढील बटन दाबून मतदान करा आणि भाकरी परतायची संधी हातातून जाऊ देऊ नका असे लाटकर म्हणाले. सौ. संगीता काटकर यांनीही मनोगत व्यक्त केले. महेश वारके यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. यावेळी वैशाली डकरे, राजेंद्र डकरे, उत्तम जाधव आदी उपस्थित होते. मेळाव्यासाठी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित लावली. 

जो ठाकरेंचा झाला नाही तो कोल्हापूरकरांचा कसा होईल? दहा वर्षे आमदार,  पराभूत होऊनही नियोजन मंडळाचे अध्यक्षपद  शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या नेत्याला दिले. मात्र इतके देऊनही जो ठाकरेंचा झाला नाही तो कोल्हापूरकरांचा कसा होईल? असा सवाल पवार यांनी जनतेला विचारला.
 

उत्तर मतदारसंघात करोडो रुपयांची कामे केली अशा आशयाचे फलक त्यांनी अनेकवेळा लावले. इतके काम खरोखर केले असते तर जनतेने त्यांना बिनविरोध निवडून दिले असते. पण जनतेला त्यांचा कांगावा कळल्यामुळे ते दारोदारी मते मागत फिरत आहेत असे त्या म्हणाल्या.


वडिलांच्या वैद्यकीय बिलाचे पैसे वसूल करणाऱ्या प्रवृत्तीचा पराभूत करा - भारती पवार