बातम्या
गुरुपौर्णिमा उत्सवासाठी शिर्डीत पोलीस बंदोबस्त वाढवा, खंडपीठाचे पोलिसांना आदेश
By nisha patil - 6/29/2023 12:57:04 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम : गुरुपौर्णिमेनिमित्त 2 ते 4 जुलै दरम्यान शिर्डी येथील साई मंदिरात आयोजित धार्मिक उत्सवात कुठलाही गोंधळ होऊ नये, यासाठी साई मंदिर आणि परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवावा, अशा आशयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाचे न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय वाघवसे यांनी नाशिकच्या विशेष पोलिस महानिरिक्षकांना आणि नगरच्या पोलीस अधिक्षकांना दिले.
गुरुपौर्णिमा उत्सवासाठी 49 लाख रुपये खर्चाची परवानगीही खंडपीठाने संस्थानला दिली. सुनावणी दरम्यान खंडपीठाने यापुर्वी रामनवमीच्या दिवशी साई मंदिरात राजकारणी, आजी, माजी विश्वस्त आणि मोठा जमाव जमला असताना प्रचंड गोंधळ झाल्याचे मंदिराच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा नगरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश यांनी खंडपीठास पाठविलेल्या अहवालाद्वारे कळविले होते. तशी घटना पुन्हा घडू नये, असे बजावत खंडपीठाने दोन्ही वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना व्यक्तीश: दक्ष राहून परिस्थितीवर नजर ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. संस्थानतर्फे अॅड. अनिल बजाज आणि मूळ याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अजिंक्य काळे यांनी काम पाहिले.
गुरुपौर्णिमा उत्सवासाठी शिर्डीत पोलीस बंदोबस्त वाढवा, खंडपीठाचे पोलिसांना आदेश
|