बातम्या
महिलांची फसवणूक करत बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला भाईंदर पोलिसांनी केले अटक
By nisha patil - 7/25/2023 6:47:20 PM
Share This News:
दुःखी आणि पीडित महिलांना हेरून, त्यांचं दुःख दूर करतो अशा भूलथापा देऊन काळ्या जादूच्या नावाखाली महिलांवर बलात्कार करणाऱ्या ढोंगी बाबाला भाईंदर पोलिसांनी अटक केली आहे. एका पीडितेच्या तक्रारीनंतर व्यवसायाने टेलर असलेल्या या बाबावर बलात्कार आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट-अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.झोपून भक्तांचं दुःख दूर करणाऱ्या या बाबाचं नाव आहे, मुकेश दर्जी. व्यवसायाने टेलर असलेला हा ढोंगी बाबा सध्या भाईंदरच्या लॉकअपमध्ये आहे. आपल्या पूर्वाश्रमीच्या जीवनातील त्रासाला कंटाळून भाईंदर येथे राहणारी एक 35 वर्षीय महिला या भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकली. ब्युटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या मैत्रिणीच्या सांगणावरुन ती 2016 मध्ये बाबाकडे आपलं दुःख-व्यथा घेऊन गेली. मात्र या बाबाने तिचं दुःख दूर करण्यासाठी तिला जे सांगितलं ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.
दु:ख दूर करण्यासाठी व्हावं लागेल विवस्त्र
तुझं दुःख दूर करण्यासाठी काळीजादू करावी लागेल. त्यासाठी तुला विवस्त्र होऊन माझ्याशी संबंध ठेवावे लागतील, असं या भोंदू बाबाने सांगितलं. जसजसे संबंध ठेवत जाशील तस तसं तुझं दुःख दूर होईल, अशा भूलथापा देवून या भोंदू बाबाने पीडितेवर तब्बल पाच वर्ष बलात्कार केला.
पीडितेने पाच वर्षांनंतर एका तरुणाशी लग्न केलं आणि ती कोलकाता येथे पतीसोबत राहायला गेली. मात्र तिथेही या भोंदू बाबाने तिचा पिछा सोडला नाही आणि हे पीडितेच्या पतीला कळल्यानंतर पीडिता आणि तिच्या नवऱ्यामध्ये भांडणं होऊ लागली. आपलं आयुष्य जसं या भोंदू बाबाने बर्बाद केलं, तसं इतर कुणाही महिलेचं होऊ नये म्हणून धाडस करत तिने गुन्हा दाखल केला. भोंदू बाबाविरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात पीडितेने गुन्हा दाखल केला.हा भोंदू बाबा काळीजादू करताना लहान मुलीच्या पोटातील कुठल्यातरी अवयवापासून बनवलेला धूप वापरतो, असं महिलेनं सांगितलं. लिंबू विधी, महिलांशी संभोग विधी, जिनला बोलावण्याचा विधी असे प्रकार तो करत असल्याचंही महिला म्हणाली. धुपामध्ये एक कापूस आणि लाल डाग असल्याचं पीडित महिलेनं सांगितलं. या भोंदू बाबाच्या आहारी गेलेल्यांनी काळी जादू करण्यासाठी आपलं मंगळसूत्र आणि घर विकून पैसे काढल्याचं पीडित महिलेनं सांगितलं.हा भोंदू बाबा चातुर्याने काम करायचा. ज्या महिलांचं बाहेर अफेर आहे अशांना तो हेरायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा, अशी माहिती पीडितेने दिली. या भोंदू बाबाने काळ्या जादूच्या नावाखाली किती महिलांवर अत्याचार केले? किती जणांना फसवलं? याबाबत अधिक तपास आता भाईंदर पोलीस करत आहेत.
महिलांची फसवणूक करत बलात्कार करणाऱ्या भोंदूबाबाला भाईंदर पोलिसांनी केले अटक
|