बातम्या

अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कचे दुसऱ्यांदा भूमिपूजन, निवडणुकीनंतर हा प्रकल्पही गुजरातला जाईल: नाना पटोले.

Bhoomipujan of Amravatis textile park for the second time


By nisha patil - 9/20/2024 9:58:01 PM
Share This News:



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम मित्रा पार्कचे भूमिपूजन हे केवळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राला काही तरी देत आहोत हे दाखवण्याचा प्रकार आहे. २३ जुलै २०२३ रोजी अमरावतीत ह्याच टेक्सटाईल पार्कचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यातील मंत्र्यांच्या हस्ते झाले. या टेक्सटाईल पार्कची अद्याप एक विटही रचली नाही. एकाच प्रकल्पाचे दोनदा भूमिपूजन करून भाजपा महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर हा प्रकल्पही गुजरातला जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
 

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी हे खोटे बोलणारी मशिन असून महात्मा गांधी यांच्या तपोभूमीतूनही ते खोटे बोलले. महाराष्ट्राला प्रकल्प दिल्याचे भासवले जाते पण दिल्लीतील गुजरात लॉबी महाराष्ट्र कमजोर करत आहेत. नागपूरातील १८ हजार कोटींचा सोलर प्रकल्पही गुजरातला गेला आहे. पण तो प्रकल्प गुजरातला गेला नाही असे उपमुख्यमंत्री फडणवीस खोटे सांगत आहेत. केंद्रातील गुजरात लॉबीच्या आदेशाने महाराष्ट्रातील उद्योग, प्रकल्प गुजरातला पळवले जात असून महाराष्ट्रात बेरोजगारी वाढवली जात आहे, त्याला भाजपा सरकार जबाबदार आहे, भाजपा महाराष्ट्राला लुटत आहे. वेदांता फॉक्सकॉनचा सेमिकंडकर चीप प्रजोक्ट गुजरातला पळवल्यानंतर महाराष्ट्राला त्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ असे सत्ताधारी सांगत होते त्याचे काय झाले?      
 

काँग्रेस व गांधी कटुंबावर नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशातील सर्व भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार आहेत, देशातील सर्व भ्रष्टाचारी नरेंद्र मोदींनी भाजपात घेतले आहेत, त्यांना भ्रष्टाचारावार बोलण्याचा काही एक अधिकार नाही. मविआ काँग्रेसचे सरकार आल्यानंतर हे सर्व भ्रष्टाचारी चक्की पिसिंग करताना करतील. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आतंकवादी, नक्षलवादी म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचा शेतकऱ्यांबद्दलचा कळवळा खोटा आहे. माजी पंतप्रधान लाल बहाद्दुर शास्त्री यांनी जय जवान, जय किसान चा नारा दिला होता पण पंतप्रधान मोदींनी जवान व किसान दोघांना बरबाद केले आहे. गांधी कुटुंबावर बोलण्याचा तर नरेंद्र मोदी यांना बोलण्याचा काही अधिकार नाही. 
 

कर्नाटकमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी गणपतीच्या मूर्तीची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. कर्नाटक पोलिसांनी त्यांच्यापासून गणपती बप्पाच्या मूर्तीला वाचवून विधिवत पूजा अर्चना करून मूर्तीचे विसर्जन केले. अनेक राष्ट्रीय वृत्तवाहिन्या आणि फॅक्ट चेक करणा-या वेबसाईट्सनी या संदर्भातले सत्य सांगितले आहे. पण पंतप्रधानापासून भाजपचे सर्वच नेते यासंदर्भात फेक न्यूज पसरवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही फेक न्यूज पसरवणा-या राज्यातील भाजपा नेत्यांविरोधात काँग्रेस पक्षाने पोलिसांत तक्रारी दाखल केल्या आहेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. 
 

शिवसेना  संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले की, संजय राऊत यांचे जास्त ऐकू नका, विधानसभा निवडणुका मविआ म्हणूनच लढवल्या जात आहेत. जागा वाटपाबाबत कोणतेही मतभेद नाहीत आणि मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निवडणुकीनंतर वरिष्ठ नेते घेतील असेही नाना पटोले म्हणाले.
 

या पत्रकार परिषदेला माजी मंत्री अमित देशमुख, डी. पी. सावंत, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहनराव हंबर्डे, एम. एम. शेख, आदी उपस्थित होते.


अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कचे दुसऱ्यांदा भूमिपूजन, निवडणुकीनंतर हा प्रकल्पही गुजरातला जाईल: नाना पटोले.