बातम्या

भुजबळ कुटुंबीयांना जिल्हा बँकेचा दणका...!

Bhujbal family hit by District Bank


By nisha patil - 1/13/2024 4:20:59 PM
Share This News:



नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक  थकीत कर्ज वसुलीसाठी ॲक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. जिल्हा बँकेकडून थकीत कर्जाप्रकरणी भुजबळ कुटुंबीयांना नोटीस धाडली आहे. माजी खासदार समीर भुजबळ  आणि माजी आमदार पंकज भुजबळ  यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे भुजबळ कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
   

भुजबळ कुटुंबीयांच्या मालकीच्या दाभाडी येथील आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.  या साखर कारखान्याकडील  51 कोटी 66 लाख रुपयांची थकबाकी आहे. बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी कारखाना स्थळावर जाऊन मागणी नोटीस चिकटवली आहे. त्याचप्रमाणे कारखान्याचे संचालक असलेल्या समीर व पंकज या भुजबळ बंधूना देखील नोटीस  पाठवण्यात आली आहे. 

51 कोटी 66 लाख रक्कम थकीत

आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (गिसाका) या साखर कारखान्यासाठी जिल्हा बँकेकडून (NDCC Bank) नोव्हेंबर 2011 मध्ये 30 कोटींचे कर्ज घेतलेले होते, पैकी 18 कोटींची नियमित कर्ज परतफेड करण्यात आली. परंतु, सन 2013 पासून कारखान्याकडील 12 कोटी 12 लाख थकीत मुद्दल व व्याज 39 कोटी 54 लाख, असे एकूण 51 कोटी 66 लाख रुपये थकीत आहेत. त्यातच बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने कडक पावले उचलली असून जिल्हा बँकेने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी कारखाना कार्यस्थळावर जाऊन ही मागणी नोटीस चिटकवली आहे.


भुजबळ कुटुंबीयांना जिल्हा बँकेचा दणका...!