बातम्या
कोल्हापूरला निर्यातीची मोठी संधी : डॉ. सुनील मांजरेकर
By neeta - 1/17/2024 1:35:39 PM
Share This News:
कोल्हापूर : कोल्हापूरला जागतिक पातळीवर निर्यातीची आणि त्यातून उद्योग विस्ताराची सध्या खूप मोठी संधी आहे. हे लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या उद्योग व्यवसाय क्षेत्रातील विविध परिषद, प्रदर्शनात सहभागी होऊन संपर्क वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना जीएमबीएफ पाठबळ देईल. आंतरराष्ट्रीय संवाद वाढवून उद्योग व्यापाराच्या विस्तार घडवा. निर्यात वृद्धीसाठी कोल्हापूरकरांना ही एक मोठी संधी असल्याचे प्रतिपादन गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम (जीएमबीएफ) दुबईचे अध्यक्ष डॉ. सुनील मांजरेकर यांनी दिला.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरतर्फे आयोजित उद्योजक, व्यावसायिकांना परदेशात असलेल्या निर्यात वृद्धीच्या संधी या विषयावरील संवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी होते. उदयमनगरातील शेठ रामभाई सामाणी सभागृहात कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश बुधले, व्यावसायिक राजीव लिंग्रज, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या निर्यात समितीचे चेअरमन रमाकांत मालू यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी, उद्योजक उपस्थित होते.
गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम दुबई (GMBF) आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर सयुंक्त विद्यमाने महाबीज २०२४ ही आंतरराष्ट्रीय व्यापार परिषद येत्या २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी दुबई येथे होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित संवादात त्यांनी उदयोजक, व्यापारी बंधूसोबत संवाद साधला.
डॉ. सुनील मांजरेकर म्हणाले, कोल्हापुरातील उद्योजक, व्यापारी व्यावसायिकांमध्ये कल्पकता, दर्जा, कौशल्य, क्षमता भरपूर आहे. त्याआधारे तयार केलेल्या उत्पादनांना जगाच्या बाजारपेठेत मोठी संधी आहे. त्यामुळे निर्यातीला मोठी संधी उपलब्ध आहे. ही संधी साधण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील संवाद वाढवून उद्योग, व्यापार-व्यवसायाचा विस्तार घडवावा. कोल्हापूरला जागतिक पातळीवर निर्यातीची आणि त्यातून उद्योग विस्ताराची सध्या खूप मोठी संधी आहे. हे लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या उद्योग व्यवसाय क्षेत्रातील विविध परिषद, प्रदर्शनात सहभागी होऊन संपर्क वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना जीएमबीएफ पाठबळ देईल. तसेच महाराष्ट्रातील उद्योजक, व्यावसायिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी गेल्या १६ वर्षापासून जीएमबीएफ कार्यरत आहे. या फोरमची सदस्य संख्या ५०० इतकी आहे. दुबईत नोकरी करणाऱ्या महाराष्ट्रातील १५० जणांना उद्योजक, व्यावसायिक बनविण्याचे काम फोरमने केले आहे. दर महिन्याला मेळावा घेऊन त्यामध्ये उद्योग, व्यवसायाबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. महाराष्ट्रातून आलेले ३० टक्के लोक दुबईत उद्योग व्यवसायात आहेत. नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के असून ते ४० टक्क्यांच्या खाली आणण्याचे आमचे ध्येय आहे.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, महाराष्ट्र चेंबरची स्थापना 1927 मध्ये झाली. ही राज्याच्या व्यापार, उद्योग, व्यावसायिक व कृषिपूरक उद्योगांची शिखर संस्था म्हणून गेल्या 95 वर्षापासून यशस्वीपणे कार्यरत आहे. राज्यातील 850 हून अधिक व्यापारी व औद्योगिक संघटना चेंबरशी संलग्न असून, शिखर संस्था म्हणून राज्यातील सात लाखांहून अधिक उद्योग व 30 लाखांहून अधिक व्यापारी आस्थापनांचे महाराष्ट्र चेंबर नेतृत्व करते. चेंबर निर्यात वृद्धीसाठी महाराष्ट्र चेंबर सातत्याने कार्यरत आहे. कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्र चेंबरने आणली. शेकडो उद्योजकांना परदेशातील गुंतवणूक मिळवून दिली. इंडोनेशिया दौऱ्यात अनेक उद्योजकांना ही संधी मिळाली. तसेच महाराष्ट्र चेंबरने २९ देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत. कोल्हापूरला या क्षेत्रात संधी बांधकाम, औषध निर्माण, फाउंड्री, ऑइल अँण्ड गॅस, सेंद्रीय शेती उत्पादने, फळे आदी क्षेत्रात कोल्हापूरला दुबईसह आफ्रिकन देशांत काम करण्याची मोठी संधी आहे. कोरोनानंतर जगातील विविध देशांनी चीनच्या उत्पादनांवर घातलेली बंदी आणि मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढविलेला देशाचा सन्मान याचा निर्यातीला चांगला परिणाम होत आहे. दुबईत कोल्हापुरातील तरुणाईला रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याचे मॉडेल (प्रारुप) जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना देणार असल्याचे डॉ. मांजरेकर यांनी सांगितले.
कोल्हापूरला निर्यातीची मोठी संधी : डॉ. सुनील मांजरेकर
|