बातम्या
कोल्हापूर बस स्थानकात सापडला बॉम्ब... ?
By nisha patil - 11/1/2024 6:30:16 PM
Share This News:
कोल्हापूर बस स्थानकात सापडला बॉम्ब... ?
कोल्हापूर : पोलीसांनी केले मॉक ड्रिल : बॉम्ब शोधक पथक,अग्नीशमन दलास पाचारण. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एका बसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली. काही मिनिटातच पोलीस, अग्नीशमन दल, बॉम्ब शोध पथके दाखल झाली. प्रवाशांना सुरक्षीतपणे बाजूला करून या संशयास्पद वस्तू तपासण्यात आल्या. पोलीसांनी केलेले हे मॉक ड्रिल (रंगीत तालीम) असल्याचे समजल्यावर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मध्यवर्ती बसस्थानकामध्ये दररोज हजारो प्रवाशी येत असतात. त्यांची सुरक्षीतता महत्वाची आहे. एखांदी दुर्घटना ओढवली तरी पोलीस व आपत्कालीन यंत्रणा किती जलद गतीने दाखल होतात हे पाहण्यासाठी बुधवारी प्रशासनाने याची रंगीत तालीम घेतली. मुंबई – पुणे बस स्थानकात बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याची माहिती एसटी प्रशासनाला देण्यात आली. एसटी प्रशासनाकडून पोलिसांना वर्दी देण्यात आली. तसेच महापालिकेचा अग्निशामक दल आणि रुग्णवाहिकेलाही माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले. तसेच श्वान पथकही घटनास्थळी दाखल झाले. बॉम्बचा शोध घेण्यास सुरवात झाली. श्वानाने माग काढत २ बेवारस बॅग शोधल्या. त्या पाठोपाठ असलेल्या बॉम्ब शोध आणि नाशक पथकान आत्याधुनिक उपकरणांच्या साह्यान बेवारस बॅगची तपासणी केली.
त्यामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू सापडली. त्याची तपासणी केली असता ते एक सर्किट असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांचा हा एक डेमो असल्याचे लक्षात आले. त्यानंतर उपस्थित प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर, नंदकुमार मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास पोडग, उपनिरिक्षक राजू भोसले यांच्यासह ५० पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
कोल्हापूर बस स्थानकात सापडला बॉम्ब... ?
|