बातम्या

मंदिरातील चोरलेल्या चांदीची बनवली विट, विकण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Bricks made of stolen silver from the temple


By nisha patil - 8/24/2023 4:33:02 PM
Share This News:



कोल्हापूर : सद्दाम शेख आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीच्या विटांना मोठी मागणी असते त्यामुळेच कोल्हापूरच्या चोरट्यांनी मंदिरातून चोरलेल्या चांदीच्या दागिन्यांची वीट बनवून विकण्याचा प्रताप केलाय, विशेष म्हणजे त्यांचा हा कारनामा पोलिसांच्या लक्षात आला आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वंदूर येथील मंदिरात चोरी करणाऱ्या या अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या, त्यांच्याकडून चांदीची बनवलेली सुमारे 9 किलो वजनाची वीट ही जप्त करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील वंदूर गावचे ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिरात 10 ऑगस्ट रोजी चोरी झाली होती, या चोरीत तब्बल नऊ किलो चांदी चोरट्यांनी लंपास केली होती, चोरलेली चांदी आठवून चांदीची वीट तयार करून ती विकण्याच्या तयारीत असतानाच कागल पोलिसांनी चार सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या. या टोळीत असलेल्या सराईत चोरट्याचे चांदी अटवण्याचे कसब पाहून पोलीसही चक्रावले.

कागल तालुक्यातील वंदूर गावातील हनुमान मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या चांदीच्या प्रभावळीची चोरी झाली होती, चोरीचा तपास करण्यासाठी ठसे तज्ञ, श्वान पथक यांना पाचारण करण्यात आले होते मात्र तांत्रिक गोष्टी उलगडत गेल्याने या चोरीचा तपास करण्यात कागल पोलिसांना यश आले आहे. या चोरीचा मुख्य सूत्रधार लखन माने हा याच गावातील असल्याने पोलिसांनी चोरीचा तपास करताना सुरुवातीपासूनच त्याच्यावर संशय व्यक्त केला चोरीनंतर तीन दिवस मोबाईल बंद ठेवून माने गावातून गायब झाला होता. गोपनीय बातमीदाराकडून माने पुणे जिल्ह्यातील कात्रज घाटात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला अटक केली आणि त्याच्याकडून साथीदारांचाही शोध लागला.

कळंबा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर चोरीचा प्लॅन

या चोरीतील मुख्य सूत्रधार लखन माने त्याचा साथीदार बापू गायकवाड, युवराज शेटके, वेंकटेश कांबळे हे सराईत चोरटे वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होते. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर इचलकरंजी येथील तांबे मळा परिसरात एकत्र येत माने याच्या गावातील हनुमान मंदिरात चोरी करण्याचा प्लॅन आखला गेला. यासाठी मुख्य सूत्रधार लखन माने याने पुढाकार घेत अन्य तिघांना तयार केले, चोरीच्या गुन्ह्यामध्ये जामिनासाठी मदत केलेल्या तिघांचे उसने पैसे फेडण्याच्या नादात सराईत चोरटा लखन माने याने गावातीलच मंदिर फोडण्याचा प्लॅन तयार केला.

चोरलेली चांदी वितळून त्याची वीट

मंदिराच्या गाभार्‍यात बसवण्यात आलेली चांदीची प्रभावळ वितळवून त्याची सुमारे 9 किलो वजनाची वीट बनवण्यात आली, यासाठी टोळीतील बापू गायकवाड याने आपले सोनार कामाचे कसबं पणाला लावत ही नऊ किलो चांदी वितळवून त्याची वीट बनवली होती आणि ही वीट विकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळीला कागल पोलिसांनी बेड्या टाकल्या. गायकवाडने यापूर्वी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मंदिर चोरी करून चांदी आणि सोन्याचे दागिने चोरले आहेत, माने याच्यावर 30 गंभीर चोरीचे तर गायकवाड याच्यावर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात 18 घरफोडी आणि मंदिर चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.


मंदिरातील चोरलेल्या चांदीची बनवली विट, विकण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ठोकल्या बेड्या