बातम्या
जागतिक बँकेच्या पथकाला पूरपरिस्थितीची माहिती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 2/14/2024 8:26:53 PM
Share This News:
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्याला भेट देण्यासाठी येणाऱ्या जागतिक बँकेच्या पथकाला जिल्ह्यातील पूर परिस्थितीची सविस्तर माहिती उपलब्ध करुन द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र रिझीलन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम हा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनामार्फत जागतिक बँकेकडे सादर करण्यात आला आहे. यामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराचे नियंत्रण व पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी राज्याच्या इतर दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्यात येणार आहे. यातील 3200 कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या निधीला जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक बँकेचे पथक बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे.
याविषयीची आढावा बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात घेण्यात आली. यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, कार्यकारी अभियंता (उत्तर) स्मिता माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भिंगारदेवे, उपविभागीय अभियंता प्रवीण पारकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, जिल्ह्यात आतापर्यंत आलेली पूर परिस्थिती, दरवर्षीचा सरासरी पाऊस, जुलै -ऑगस्ट महिन्यामध्ये असणारे पावसाचे प्रमाण, पुरादरम्यान पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी, झालेली व संभाव्य जीवित व वित्तहानी, स्थलांतरित नागरिक व जनावरे, पुरामुळे शेती, रस्ते, घरे, पूल आदीचे होणारे नुकसान, होणारी बाधित गावे ही सर्व माहिती तयार ठेवावी. तसेच पुराने वेढा पडणाऱ्या गावांना पूर परिस्थितीत दळणवळणासाठी पूल आवश्यक असणाऱ्या गावांची नावे, भूस्खलन होणारी गावे व ठिकाणे, तसेच पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांची छायाचित्रांसह सविस्तर माहिती तयार ठेवा, अशा सूचना त्यांनी केल्या.
जिल्ह्याला भेट देण्यासाठी येणाऱ्या जागतिक बँकेच्या या पथकामध्ये जोलांथा क्रिस्पीन वॅटसन, अनुप कारनाथ, जार्क गॉल, स्वाती पिल्लई,सविनय ग्रोव्हर यांचा समावेश असून हे पथक जिल्ह्यातील पूर परिस्थिती नियंत्रणाच्या उपाययोजनांच्या दृष्टीने जिल्ह्यातील पूर प्रवण ठिकाणांना भेटी देऊन पाहणी करणार आहे. यानंतर जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात या नियोजन आराखड्याबाबत रात्री बैठक होणार आहे.
जागतिक बँकेच्या पथकाला पूरपरिस्थितीची माहिती द्या : जिल्हाधिकारी अमोल येडगे
|