बातम्या
२४ तास कॅलरीज बर्न होतील, आराम करतानाही! फक्त दिवसातून ‘या’ ५ हालचाली करा!
By nisha patil - 5/15/2024 9:08:28 AM
Share This News:
व्यायाम करताना भरमसाठ कॅलरी जाळायच्या आणि मग जरा आरामात बसलं, खाल्लं की तेवढ्याच पुन्हा वाढवून घ्यायच्या हे वर्तुळ आता मोडायला हवं. आदर्शपणे तुम्ही करत असणारा व्यायाम असा हवा की जो तुमचा चयापचयाचा वेग, तुमच्या शरीरातून कॅलरीज बर्न करायचा वेग हा तुम्ही व्यायाम करताना व आराम करताना दोन्ही वेळेस समांतर ठेवू शकेल. वेगळ्या शब्दात सांगायचं तर, तुमचं शरीर केवळ व्यायामाचा एक तासच नव्हे तर संपूर्ण २४ तासात कॅलरीज बर्न करू शकेल असं व्यायामाचं रुटीन तुम्ही स्वीकारायला हवं. कमी वेळात असा जास्त फायदा आपण कसा मिळवू शकतो हे जाणून घेण्यासाठी आजचा लेख आवर्जून वाचा.
व्यायामानंतर आराम करताना शरीर कसे वापरते कॅलरीज...?
व्यायामानंतर शरीरातील कॅलरीजची होणारी झीज ही EPOC किंवा व्यायामानंतर शरीरात वापरला जाणारा ऑक्सिजन या वैशिष्ट्यानेही ओळखली जाते. वेगवान शारीरिक हालचालींना दिलेला हा एक शारीरिक प्रतिसाद असतो जो शरीराला विश्रांतीनंतर अनेक तास कॅलरी वापरण्याची गरज निर्माण करतो. व्यायामानंतरची वाढीव हृदय गती, श्वासोच्छ्वास पूर्वीप्रमाणे करण्यासाठी, हार्मोन्सवर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच स्नायूंच्या पेशींचे पुनरुत्पादन आणि दुरुस्तीसाठी शरीर या कॅलरीज वापरू लागते.
हे फायदे प्राप्त करण्यासाठी आपण खालील पाच प्रकारच्या व्यायामांना प्राधान्य देऊ शकता.
सर्वांगीण आरोग्य तज्ज्ञ मिकी मेहता यांनी सुचवलेले हे पाच व्यायाम प्रकार पाहा...
*१) लंजेस, बर्पी, साइड प्लँक, पुश-अप्स, स्क्वॉट टू लंज, लंज वॉक यांसारख्या व्यायामाच्या प्रकारामुळे अनेक स्नायू एकत्र कार्यरत होतात. याची उच्च तीव्रता असल्यास आपल्याला कॅलरीज बर्न करायला सुद्धा मदत होऊ शकते.
*२) गुडघ्याचा आधार घेत पुश अप्स, हाफ पुश अप्स, क्विक पुश अप्स यासारख्या व्यायामाच्या प्रकारामुळे कोअरची ताकद वाढण्यास मदत होते. वजन उचलून किंवा प्रतिरोधक बँडसह व्यायाम करून चयापचय सुधारणाऱ्या हालचाली करणे फायदेशीर ठरते. रेसिस्टन्स ट्रेनिंग हे स्नायूंमधील तंतुवर ताण देत असल्याने अनेकदा हे तंतू तुटतात, यांच्या दुरुस्तीसाठी ऊर्जेची आवश्यकता असते. परिणामी ही दुरुस्ती करताना शरीर अधिक कॅलरीज खर्च करते.
*३) सायकलिंग, स्पीड स्पॉट जॉगिंग, जंपिंग जॅक या प्रकारामुळे तुमची हृदय गती आणि चयापचय वाढते, त्यामुळे EPOC म्हणजेच व्यायामानंतर ऑक्सिजनचा जास्त वापर करण्याची शरीराला गरज भासते.
*४) रोज १० मिनिटांत १० सूर्यनमस्कार केल्यास लवचिकता वाढायला मदत होते. याचे मुख्य कारण म्हणजे यामध्ये वाकणे, वळणे, ताणणे असे सगळे घटक समाविष्ट असतात. यामुळे ऊर्जा व चैतन्य वाढण्यास मदत होते.
*५) सर्किट ट्रेनिंग अंतर्गत लॅटरल पुलडाउन्स, सिंगल-बार आणि डंबेलसह लंजेस यामुळे एका तासाच्या व्यायामाने मिळणारे फायदे त्याच्या एक तृतीयांश वेळेत प्राप्त होऊ शकतात.
२४ तास कॅलरीज बर्न होतील, आराम करतानाही! फक्त दिवसातून ‘या’ ५ हालचाली करा!
|