बातम्या

डॉ.संजय डी.पाटील यांचा ‘ऍग्री लिजंड अवॉर्ड’ने सन्मान

By Dr Sanjay D Patil Honored with Agri Legend Award


By nisha patil - 4/13/2024 11:03:07 PM
Share This News:



डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष आणि डी. वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदेचे (कोल्हापूर) कुलपती डॉ संजय डी पाटील यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी 'अॅग्री लीजंड अवॉर्ड'  ने सन्मानित करण्यात आले. भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचे कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग आयुक्त डॉ. पी के सिंग हस्ते डॉ. संजय पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.   स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक श्री राजेश कुमार व रे कन्सल्टिंग चे संस्थापक राजकुमार अगरवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘रे कन्सल्टिंग’  या ख्यातनाम संस्थेच्यावतीने ‘एग्री बिजनेस समिट अँड अवॉर्ड’ (ABSA)चे गेल्या पाच वर्षापासून आयोजन केले जाते. कृषी क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदान, दर्जेदार उत्पादने, विक्रीपूर्व आणि नंतरची सेवा, नाविन्यपूर्ण प्रयोग यासाठी प्रोत्साहन व पाठबळ देण्याचे काम संस्थेमार्फत केले जाते. कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण प्रयोग आणि उत्कृष्ट कृषी निविष्ठा आणि सेवा देणाऱ्या व्यक्तीच्या कार्याचा सन्मान  एग्री बिजनेस समिट अँड अवॉर्डद्वारे केला जातो. कृषिक्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरीसाठी इतरांना प्रेरणा मिळावी हा या पुरस्कारामागील उद्देश आहे.   कृषी प्रधान देशांत कृषी व्यवस्थेला अधिक गती मिळावी यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. 

डॉ. संजय पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे(ता.हातकणगले)  येथे सुमारे २०० एकर खडकाळ- मुरमाड जमिनीचे प्रचंड मेहनतीने गोल्डन लँड मध्ये रूपांतर केले आहे. या ठिकाणी शेतीतील विविध प्रयोग डॉ. पाटील यांनी यशस्वीपणे राबवले आहेत. विविध प्रकारची  फळे व भाजीपाला यांचे उत्पादन घेतले जाते. डॉ. पाटील यांनी कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, त्याचबरोबर खासगी क्षेत्रातील पहिल्या डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठची स्थापना केली. डॉ. संजय डी. पाटील  कृषी विकासासाठी सातत्याने  देत असलेल्या योगदाना बद्दल त्यांना या विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले.

डॉ. संजय डी. पाटील यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल व शेती प्रणालीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाच्या अवलंब केला आहे.  शेतामध्ये जागेवर बायोमास वापर, जैविक खते आणि जैव कीटकनाशकांचा वापर, शेतमालाचे वर्गीकरण, प्रतवारी, पॅकिंग आणि साठवण, झिरो एनर्जी शीत गृहाचा वापर, उत्पादकता वाढीसाठी उपाययोजना, उत्पादन आणि व्यवस्थापन प्रणालीमध्ये समाविष्ट केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग आधुनिक यंत्रसामग्रीचा, पाणी बचत तंत्रज्ञानाचा अवलंब, रोग/कीट प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरलेले तांत्रिक पर्याय,  इस्राईलच्या धर्तीवर अत्याधुनिक डेअरी फार्म या कार्याचा सन्मान म्हणून डॉ. पाटील यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 

भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागचे आयुक्त डॉ. पी के सिंगच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, प्रताप महाले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.


डॉ.संजय डी.पाटील यांचा ‘ऍग्री लिजंड अवॉर्ड’ने सन्मान