बातम्या

मानसिक आरोग्याचीही काळजी.. आजची गरज

Care of mental health too


By nisha patil - 5/2/2024 7:36:09 AM
Share This News:



 

दैनंदिन जीवन जगताना अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जाव लागत. घरातली माणसं आपल्या पद्धतीने ती सोडवण्याचा, त्यांना सामोरं जाण्याचा प्रयत्न करतात. समस्या सोडविण्यासाठी कधी कुटुंबातील वडिलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले जाते तर कधी शेजाऱ्याकडे धाव घेतली जाते. कधी मित्रमंडळीकडून मदत होते. आपल्या आयुष्यात येणाऱ्या विविध प्रसंगाना नि भावनांना समर्थपणे सहजतेने सामोरं जाण्याची कुवत ज्या व्यक्तीमध्ये असते अशा व्यक्तीला मानसिक स्वास्थ लाभलं अस म्हणता येईल. परंतु आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्वच समस्यांना समाधानकारक उत्तर मिळतात किंवा मार्ग सापडतात, असे होत नाही. सर्वच व्यक्तीमध्ये येणाऱ्या प्रसंगांना धीराने सामोरे जाण्याची कुवत असतेच अस नाही. ऑक्टोबर महिन्यात 'मेंटल हेल्थ वीक' मानसिक आरोग्याचा आठवडा सर्वत्र पाळला जातो...याविषयी.

एखाद्या तज्ज्ञ मानसशास्त्रीय सल्लागाराची मदत घेतली तर मनावरचा ताण कमी होऊन समस्येवर निश्चितपणे तोडगा काढता येवू शकतो. मात्र यासंदर्भात आपल्याकडे फारशी जागरुकता नाही. उलट अनेक प्रकारचे गैरसमज लोकांमध्ये आढळतात. मानसतज्ज्ञाकडे किंवा मनोविकारतज्ज्ञाकडे जाणे ही गोष्ट सामाजिक प्रतिष्ठेच्या आड येणारी किंवा त्यात बाधा आणणारी बाब समजली जात असल्यामुळे आणि 'आमचा मुलगा वेडा थोडाच आहे वेड्याच्या डॉक्टरकडे न्यायला' अशा गैरसमजुतीमुळे पालक स्वत:च्या हाताने स्वत:च्या मुलाचे/ मुलीचे नुकसान तर करतातच. पण कुटुंबातील समस्या ही आणखी बिकट करुन ठेवतात. दैनंदिन जीवनात येणाऱ्या सामाजिक आणि मानसिक समस्याकडे जागरुकतेने पाहण्याची दृष्टी आपण हरवली आहे. विशेषत: मानसिक आजारांच्या समस्याकडे असंवेदनशिल दृष्टीने पाहण्याच्या वृत्तीमध्ये वाढ होत आहे. अनेकदा समस्या कंठाशी येईपर्यंत घरातून फारशी हालचाल होताना दिसत नाही. शारिरीक आजारावर तत्काळ औषधोपचार होणे आवश्यक असतं. तसंच मानसिक समस्यांवर करणेही निकडीच असतं. हे समाजाला पटवून देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

मनोरुग्ण म्हणजे मानसिकदृष्ट्या आजारी रुग्ण. समाजात या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. आजकाल शिक्षण आणि व्यवसायातील तीव्र स्पर्धेमुळे अनेक प्रकारच्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं. जे स्पर्धेला आव्हानांना समर्थपणे तोंड देवू शकतात. संयम राखून स्वत:ला सावरुन कठिण प्रसंगांना शांतपणे, स्वत: गडबडून न जाता सामोरं जाण्याच कौशल्य ज्यांच्यामध्ये असते, त्यांच्याबाबतीत समय कमी प्रमाणात उद्भवतात. पण ज्यांच्यात परिस्थितीला सामोरं जाण्याची क्षमता, धैर्य, आत्मविश्वास कमी असतो, अशांच्या बाबतीत उद्भवणाऱ्या समस्या, योग्य उपचार आणि मार्गदर्शनाअभावी गंभीर रुप धारण करु शकतात. परिणामी मत्सर, स्ट्रेस, नैराश्य, न्यूनगंड, वैफल्य तसेच भीती, हिंसा, ताण, चिंता, अस्थिरता आणि असुरक्षितता याही नकारात्मक आणि विघातक भावनांच्या गर्तेत सापडून व्यक्ती आपलं मानसिक संतुलन हरवून बसतात.

काहीजण त्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून एखाद्या व्यसनाचा आधार घेतात आणि समस्या आणखी अवघड करुन ठेवतात. अशा व्यक्ती स्वत:चा विकास करुन घेण्यास असमर्थ तर असतातच पण घरच्यांसाठी एक समस्या होऊन बसतात. तात्पर्य मानसोपचाराची तसेच समुपदेशन केंद्राची उपलब्धता ही काळाची गरज ठरली आहे. समुपदेशनाद्वारे व्यक्तीला तिच्या तात्कालिक समस्येतून बाहेर येण्यास मदत केली जाते. पण भविष्यात जर पुन्हा समस्या उत्पन्न झाली तर स्वबळावर त्या समस्येतून बाहेर पडू शकेल. इतपत व्यक्तीचा आत्मनिर्भर बनवण्यावरही भर दिला जातो.

आपल्या मनाची मदत घेऊन आपणच आपली समस्या सोडवू शकू, इतका विश्वास समुपदेशक समस्याग्रस्त व्यक्तीला मिळवून देतो. प्रत्येक समस्येसाठी औषधाचीच गरज असते असे नाही. उदा. अभ्यासात मुलाची प्रगती दिसत नाही, ही केस मुळात मानसतज्ज्ञाकडे जायला हवी. मुलाचा बुध्यांक काढून अभ्यासात प्रगती न होण्याच्या कारणांचा शोध घेतल्यास म्हणजे (लेखन, वाचन कौशल्यांचा अंदाज, स्मरणशक्ती आकलन, निरीक्षण शक्ती एकाग्रहता इत्यादी ) तसेच जिद्द चिकाटी, आळस नकारात्मकवृत्ती आणि शाळेतील समस्यांबद्दल जाणून घेऊन त्याप्रमाणे मार्गदर्शन केल्यास आणि आवश्यक कौशल्ये शिकविल्यास मुलांमध्ये अनेकदा आश्चर्यकारक प्रगती झालेली दिसते. याउलट काही ठिकाणी औषध हा अत्यंत महत्वाचा आणि अपरिहार्य घटक ठरतो. टोकाची चिंता, नैराश्य, ताण, भीती, औदासिन्य, अस्वस्थता असेल आणि त्यामुळे दैनंदिन जीवन जगताना अडथळे येत असतील तर अशावेळी मन स्थिर आणि शांत करण्यासाठी औषधांची काही काळापर्यंत निश्चित आवश्यकता असते.
 


मानसिक आरोग्याचीही काळजी.. आजची गरज