बातम्या
आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 4/13/2024 10:46:32 PM
Share This News:
कोल्हापूर, दि.13 : जिल्ह्यात लोकसभा निवडणूका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले.
जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत जिल्हाधिकारी श्री. येडगे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी हरीष धार्मिक, खर्च समिती नोडल अधिकारी अतुल अकुर्डे तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिली. ते म्हणाले, निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे. आदर्श आचारसंहिता कालावधीत प्रत्येक सार्वजनिक व राजकीय कार्यक्रमांवर तसेच या कार्यक्रमांतील भाषणांवर निवडणूक प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे.
उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र 19 एप्रिल पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारले जातील. यात 13, 14 व 17 एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने नामनिर्देशन पत्रे स्विकारली जाणार नाहीत. नामनिर्देशन पत्र दाखल करताना कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात फक्त 3 वाहने आणि उमेदवारासह 5 व्यक्तींना प्रवेश दिला जाईल.
तसेच उमेदवारांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील जाहीराती या माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीकडून मंजूरी मिळाल्यानंतर प्रसारित कराव्यात. उमेदवारांना दैनंदिन खर्च सादर करणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी स्वतंत्र बँक खाते काढून घेणे आवश्यक आहे. दिव्यांग व 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा देण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या सर्वांना फॉर्म 12 देण्यात येणार असून दिव्यांग व 85 वर्षावरील मतदार मतदान करण्यापासून वंचित राहणार नाहीत याची खबरदारी घेण्यात येणार आहे. तसेच निवडणूक कामात कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची व्यवस्था करण्यात आल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांचे जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी निराकरण केले. संजय तेली, समाधान शेंडगे, हरिष धार्मिक व अतुल अकुर्डे यांनी आदर्श आचारसंहिता, निवडणूक प्रक्रिया, नामनिर्देशन पत्र, खर्च हिशोब आदी विषयांबाबत माहिती दिली.
आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे
|