बातम्या
कोल्हापुरात आठवडाभर गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता
By nisha patil - 10/5/2024 5:01:51 PM
Share This News:
मुंबई, संपूर्ण कोकण वगळता कोल्हापूरसह राज्यातील २९ जिल्ह्यांत पुढील आठवडाभर म्हणजे गुरुवार, दि. १६ मेपर्यंत ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.राज्यातील २९ जिल्ह्यांत रविवार, दि. १२ मेपासून त्यापुढील ५ दिवस म्हणजे गुरुवार, दि. १६ मेपर्यंत मध्यम अवकाळी पावसासोबत विशेष गारपिटीची शक्यताही नाकारता येत नाही. गडगडाटासह विजा, वारा, गारा आणि धारांची शक्यता निवृत्त हवामानतज्ज्ञ डॉ. माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. या पाच दिवसांत कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या पाच जिल्ह्यांत मध्यम अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या शक्यतेची तीव्रता अधिक जाणवते.मुंबईसह संपूर्ण कोकणात मात्र आठवडाभर म्हणजे गुरुवार, दि. १६ मेपर्यंत सरासरीइतके म्हणजे ३५ आणि २५ डिग्री सेल्सिअस ग्रेडदरम्यानचे कमाल आणि किमान तापमान राहणार असून तेथे उष्णतेची लाट, दमटयुक्त उष्णता, रात्रीचा उकाडा अथवा अवकाळी पाऊस यांसारख्या कोणत्याही वातावरणाची शक्यता नाही. एकंदरीत लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या व पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान महाराष्ट्रात कोणतीही उष्णतेची लाट जाणवणार नाही.शिवाय ढगाळ वातावरण आणि काहीशा वारा वहनातून २९ जिल्ह्यांत दुपारी ३ वाजताचे कमाल तापमान ४० ते ४३ डिग्री सेल्सिअस ग्रेडदरम्यान म्हणजे सरासरीइतके किंवा क्वचितच एक ते दोन डिग्री सेल्सिअस ग्रेडने अधिक जाणवेल. त्यामुळे उन्हाचा विशेष चटका जाणवणार नाही.
कोल्हापुरात आठवडाभर गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता
|