बातम्या
शक्ती प्रदर्शन करत चंद्रहार पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज
By nisha patil - 4/19/2024 4:37:42 PM
Share This News:
अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार सुमनताई पाटील आणि काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत उपस्थित होते.
सांगलीमध्ये चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, यावर आता जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे. दरम्यान, आज चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संजय राऊत सांगलीमध्ये पोहोचल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत संजय राऊतांच्या भेटीसाठी पोहोचले. संजय राऊत हॉटेलवर उतरल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी विक्रम सावंत यांच्यासह जयंत पाटील हे सुद्धा पोहोचले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी
शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उपनेते संजय पवार, नितीन बानुगडे पाटील आणि विक्रम सावंत आदी नेत्यांमध्ये चर्चा झाली.
नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर नेते अर्ज भरण्यासाठी निघाले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून वाद रंगला होता तो वाद आता शांत झाला आहे का? अशी सुद्धा चर्चा रंगली. राऊतांच्या भेटीनंतर आमदार विक्रम सावंत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सांगलीमधील उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्ष उपस्थित आहेत. काँग्रेस प्रदेश पातळीवरून आलेल्या निरोपानुसार आल्याचे विक्रम सावंत यांनी सांगितले. आघाडी धर्मा आम्ही पाहणार असल्याचे विक्रम सावंत यांनी नमूद केले. यापूर्वी जी काही प्रक्रिया झाली त्यामध्ये आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केल्याचे विक्रम सावंत म्हणाले.
दरम्यान चंद्रावर पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विश्वजीत कदम उपस्थित राहणार की नाही? याचीच चर्चा सर्वाधिक रंगली होती. मात्र, विश्वजीत कदम यांच्या मातोश्री आजारी असल्याने ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचू शकले नाहीत.
शक्ती प्रदर्शन करत चंद्रहार पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज
|