बातम्या

आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा शुक्रवारपासून : सत्यजित जाधव

Chandrakant Jadhav Memorial Cup T20 cricket tournament to begin from Friday


By nisha patil - 6/2/2024 7:29:25 PM
Share This News:



कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : शांद फाऊंडेशन व परिवहन कल्चर स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्या वतीने आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० लेदर बॉल खुली आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत कोल्हापुर, मुंबई व सांगली येथील एकूण आठ संघ सहभागी होणार असून स्पर्धा दि. ९ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत होणार असल्याची माहिती युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सत्यजित जाधव म्हणाले, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव हे प्रसिध्द फुटबॉलपटू होते, हे सर्वज्ञात आहे. याचबरोबर ते एक चांगले क्रिकेटपटूही होते. क्रिकेटवरील प्रेमापोटी त्यांनी जशी फुटबॉलपटूंना मदत केली होती, तशी क्रिकेटपटूंनाही मोठी मदत केली आहे. शिवाय त्यांनी ज्या पद्धतीने फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या, त्याच पद्धतीने क्रिकेट स्पर्धाही आयोजित करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र ही इच्छा अपूर्ण राहिली. ती पूर्ण व्हावी म्हणून आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन गेल्यावर्षी पासून केले जात आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे.

स्पर्धेतील सामने शाहूपुरी जिमखाना, शास्त्रीनगर येथील क्रिकेट मैदान, व शिवाजी विद्यापीठातील मैदानात खेळवले जाणार आहेत. शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता आमदार जयश्री जाधव व आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तर अंतिम सामना दि. १५ फेब्रुवारी रोजी होणार असून, स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी मंत्री, आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या संघास ७५ हजार व उपविजेता संघास ४० हजार रुपये व स्मृती चषक तसेच प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज व मालिकावर असे वैयक्तिक बक्षीस देण्यात येणार असल्याचे सत्यजित जाधव यांनी सांगितले. 

यावेळी या पत्रकार परिषदेस शांद फाऊंडेशनचे मधू बामणे, अनिल शिंदे, राजू भोसले, शिवाजी पाटील, विक्रम जाधव, विजय कोंडाळकर, योगेश सूर्यवंशी, चारुदत्त सूर्यवंशी, किशोर कटके, अमित ढेरे, राजाराम कुलकर्णी , आशिष पवार, अभिजीत ढेरे आदी उपस्थित होते.


आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० क्रिकेट स्पर्धा शुक्रवारपासून : सत्यजित जाधव