बातम्या
चाळीशीच्या महिलांसाठी चौसूत्री मंत्र
By nisha patil - 6/18/2023 8:18:58 AM
Share This News:
1.योग्य व्यायाम ः रोज एखादं व्रत अंगिकारल्याप्रमाणे योग्य पद्धतीने योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा. त्यासाठी “जिम’ला जायचे असले तरी तुम्ही जाऊ शकता काहीच करायचे नाही असे न करता योगासने, इतर घरगुती व्यायाम तरी करावेत.
पण चाळीशीतील सर्वात उत्तम व्यायाम म्हणजे चालणे. सकाळच्या निरोगी ओझोन व ऑक्सिजनयुक्त प्रदूषणमुक्त हवेत सकाळचं फिरण आनंददायी व उत्साहवर्धक असतं.
निसर्गरम्य वातावरणात फुला-पानांचा सुगंध आणि पक्ष्याचे आवाज ऐकत खोलवर छातीभरून श्वास घेत चालणं या सारखा सुंदर व्यायाम नाही. हे सकाळचे प्रफुल्लदायी वातावरणच आपल्याला शारीरिक व मानसिक उभारी देते. अर्थात, प्रत्येक शहरात असा निसर्ग मिळणं म्हणजे एक आतकाल एक स्वप्न होत चालल आहे. काही नाही तर निदान आपल्याकडील टेरेसवर रोज 30-40 मिनिटे झपझप चालावं तरी.
शक्यतो रोज स्त्री असो वा पुरुष त्यांनी पायी 3-4 कि.मी ची रपेट मारावी. चालताना एक काळजी घ्यावी की आपल्या पायात योग्य अशी पादत्राणं आहेत का नाहीत? उंच टाचाच्या चप्पल घालू नयेत. आपण पडू शकू अशी कोणतीही पादत्राणे वापरू नयेत. रोज नियमित चालण्याचा व्यायाम करावा.
2.योग्य आहार ः आहारातून दूध, पालेभाज्या, फळे, कॅल्शियम, व्हिटॅमिन्सचा समावेश असावा. तंतुमय पदार्थ जास्त खावेत. कोंड्याचा मांडा खऱ्या अर्थानं करावा व खावा.
3.योग्य तपासणीः डॉक्टरांकडून तपासणी करून सल्ला घ्यावा. काही त्रास होण्याआधीच हे करावे. काही होण्याची वाट बघू नये. आजाराला योग्य प्रतिबंध करणारे उपाय करावेत.
4.योग्य नियोजन ः निवृत्तीपूर्वीच्या या काळात योग्य नियोजन करावे. हा सार्थकतेचा काळ एन्जॉय करावा. आतापर्यंत सगळं आयुष्य धडपडीत, धावपळीत, मुलांच्या, घरच्या खस्ता खाण्यात गेलं. खूप मिळवलं पण किती गमावलं? खूप गोष्टी केल्या पण कितीतरी करायच्या राहून गेल्या. याचा आत्मशोध, घ्यावा. आतापर्यंतच्या धकाधकीत कितीतरी गोष्टी मनाच्या तळघरात अडगळीत टाकल्या होत्या त्या बाहेर काढून घासून पुसून स्वच्छ कराव्यात. आवडीनिवडी जोपासाव्यात, छंदासाठी वेळ देऊन त्यातील आनंद उपभोगावा, आवडीची गाणी ऐकावीत, आवडीच काही शिकावं, योग्य नियोजनाने निर्मळ आनंद देणारा लांबचा प्रवास करावा. सुहृदांच्या भेटीगाठी घ्याव्यात एरवी ज्या घ्यायला आज चाळीशी उजाडली हे विसरू नये. आवडत्या पुस्तकांचं वाचन करावे, पर्यटनाची हौस व पैसा असणाऱ्यांनी परदेश प्रवास करावा. ज्वलंत देशप्रेमाचा अभिमान सार्थक करण्यासाठी सामाजिक कार्य करावे. या व अशा किती तरी गोष्टी ज्या व्यक्तीनुरूप बदलतील त्या सर्व गोष्टींना मनाच्या गाभाऱ्यातून बाहेर काढावे, त्याला नुसताच उजाळा नाही तर चकाकी द्यावी.
ज्याची आवड होती पण ती गोष्ट जमली नाही अशी गोष्ट आता जमते का ते बघावे. अजून वेळ अजिबात गेलेली नाही अशी गोष्ट आता मला जमणारच हा आत्मविश्वास अंगी बाणावा. अजून वेळ अजिबात गेलेली नाही. उलट आता आर्थिक स्थैर्य आलंय, जरासा निवांतपणाही आहे. तेव्हा काही पूर्वीची खुणेची पानं उघडायला काहीच हरकत नाही. गुला सुकला तरीदेखील त्यातले सौंदर्य कमी होत नसतं. बकुळीचा सुगंध चिरंतन मनाला ताजातवानच करीत असतो. पण त्यासाठी तब्येत मात्र चांगली हवी. तब्येतीची कुरबूर नको. म्हणजे मग आयुष्याचा ऐलतीर असो नाही तर पैलतीर संध्या छायाचं काय कोणीच आपल्या हृदयाला भिवविणार नाही.’
आयुष्यातील प्रत्येक दिवस हा सुखद, रमणीय, शांत, होईल. चाचण्या किंवा तपासण्याकरून घेणे हे काही आपल्या त्रासांवरचे किंवा व्याधींवरचे उपाय नसून आपली आरोग्यस्थिती नक्की कशी हे कळण्याचे मार्ग आहेत. चाळीशीनंतर दरवर्षी तपासण्या करवून घ्यायलाच हवी. दीर्घायू जीवनाचा हा कानमंत्र आहे. ही स्वतःच स्वतःसाठीची प्रेमभेट होय. हे विसरू नये. चौसूत्री मंत्राने चाळीशी आनंदी होईल.
चाळीशीच्या महिलांसाठी चौसूत्री मंत्र
|