बातम्या

राज्यातील सात हजार पोलिसांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक:

Cheating of hundreds of crores of 7000 policemen in the state


By nisha patil - 7/27/2023 6:19:40 PM
Share This News:



राज्यातील सात हजार पोलीस  अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची घर देण्याच्या नावाखाली शेकडो कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. 2009 साली सत्यपाल सिंग पुण्याचे पोलीस आयुक्त असताना राज्यातील पोलीस अधिकारी आणि कुटुंबांना पुण्याजवळ माफक दरात फ्लॅट देण्यासाठी तब्ब्ल 117 एकरांमध्ये 'पोलीस मेगा सिटी' उभारण्याची घोषणा करण्यात आली. राज्यभरातील पोलिसांनी त्यामध्ये पैसे गुंतवावेत यासाठी तसे सर्क्युलर काढण्यात आले. मात्र सात हजार पोलिसांनी आयुष्यभराची कमाई गुंतवलेल्या या प्रकल्पाची अवस्था भयाण झाली आहे. अर्धवट बांधलेल्या मोजक्या इमारती मोडकळीस आल्यात तर बांधकाम साहित्याला गंज लागला आहे. तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांच्या आदेशाने सर्क्युलर काढण्यात आल्याने राज्यभरातील पोलिसांनी विश्वास ठेऊन पोलीस मेगा सिटीसाठी पैसे द्यायचं ठरवलं. बांधकाम क्षेत्राचा कोणताही अनुभव नसलेल्या बी. ई. बिलिमोरिया कंपनीला हा अवाढव्य प्रकल्प उभारण्याचं काम देण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात या कंपनीकडे कोणतंही भांडवल नव्हतं. पोलिसांच्याच पैशातून ही 117 एकर जागा कंपनीच्या नावावर विकत घेण्यात आली होती

या 117 एकरांमध्ये बारा मजल्यांच्या 60 इमारती उभारण्यात येतील आणि त्यातून सात हजार पोलिसांना घरे देण्यात येतील, असं चित्रं रंगवण्यात आलं होतं. त्यामुळं आय. पी. एस. दर्जाच्या अधिकाऱ्यांपासून ते पोलीस कॉन्स्टेबलपर्यंत सर्वांनी यात पैसे गुंतवले. पोलीस कर्मचारी असलेल्या राहुल पाटील यांच्या वाडिलांनी देखील इथे असेच दोन मुलांसाठी दोन फ्लॅट घेण्यासाठी तीस लाख रुपये गुंतवले. त्यासाठी कर्ज काढलं. मात्र आता बॅंँकचे हप्ते आणि  घरभाडं असा दुहेरी बोजा त्यांच्यावर पडत आहे. 

ज्या बिल्डरला हा मेगा प्रकल्प उभारण्याचं काम देण्यात आलं त्यानं काही मोजक्या इमारती उभारल्या आणि त्याबदल्यात तो आणखी पोलीस कर्मचाऱ्यांकडून पैसे घेत गेला. 250 कोटी रुपयांहून अधिक रक्कम या बिल्डरने पोलिसांकडून गोळा केली. मात्र, स्वतःच भांडवल काहीच नसल्यानं हळूहळू हा प्रकल्प रखडायला लागला. बांधकामासाठी इथं आणण्यात आलेल्या यंत्राला गंज चढला आहे. या अवाढ्यव्य प्रकल्पासाठी लागणारं बांधकाम साहित्य तयार करण्यासाठी इथं उभारण्यात आलेला भला मोठा कारखानाही पुढे बंद पडला. आज इथल्या सगळ्या वस्तूंना गंज चढलाय . 

या बिल्डरला पोलीस दलातील वरिष्ठांच्या पाठींब्यानेच एवढा मोठा प्रकल्प उभारण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं आणि वरिष्ठांच्या आशीर्वादाचे फसवणुकीचा हा प्रकार पुढं सुरु राहिला. इथं प्रकल्प पाहण्यासाठी आणि त्यामध्ये घर बुक करण्यासाठी येणाऱ्यांना या बिल्डरकडून या भव्य प्रकल्पाचं प्रारुप दाखवण्यात येत होतं. प्रकल्पच्या सुरुवातीलाच मांडलेलं हे चकचकीत प्रारूप इथं येणाऱ्या प्रत्येकाला भुरळ घालत होतं. मात्र, सात हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अडीचशे कोटी रुपयांची फसवणूक होऊनही बी. इ. बिलिमोरिया कंपनीचा मालक आणि त्याला पाठीशी घालणारे पोलीस खात्यातील वरिष्ठ मोकाट आहेत. इतरांच्या अन्यायाविरोधात उभे टाकणारे हा पोलीस त्यांची आयुष्यभराची कमाई अशी मातीमोल असताना असहाय्यपणे बघण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाही आहेत.


राज्यातील सात हजार पोलिसांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक: