बातम्या

पन्हाळा तालुक्यातील आकुर्डे येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा पाच दिवसांच्या भव्यदिव्य कार्यक्रमांनी संपन्न

Chhatrapati Shivaji Maharaj birth anniversary celebrations at Akurde in Panhala taluka concluded with five days of grandiose events


By nisha patil - 2/22/2024 7:36:39 PM
Share This News:



पन्हाळा तालुक्यातील आकुर्डे येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा पाच दिवसांच्या भव्यदिव्य कार्यक्रमांनी संपन्न.

कळे -वार्ताहर  पन्हाळा तालुक्यातील आकुर्डे येथे गावातील सर्व तरुणांनी एकत्र येत दिनांक 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या एकूण पाच दिवसांमध्ये विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन केल्याने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.
   

 गावातील सर्व शिवभक्तांनी एकत्र येत दिनांक 16 फेब्रुवारी रोजी गावातील ग्रामदैवत मंदिर व परिसर , गावातील रस्ते,गटारे यांची स्वच्छता करण्यात आली. दिनांक 17 फेब्रुवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले व रात्री महाराष्ट्राची संस्कृती जपणारा भव्य गर्जा महाराष्ट्र माझा हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. दिनांक 18 फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व सायंकाळी पारंपरिक व मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.                

दिनांक 19 फेब्रुवारी या मुख्य दिवशी सकाळी पन्हाळगडावरून शिवज्योत आगमन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व शालेय मुलांसाठी भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी रांगोळी स्पर्धा व संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर सायंकाळी गावातील शालेय मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला शेवटी भाषण, रांगोळी व संगीत खुर्ची या स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावलेल्या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले व सायंकाळी भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर दिनांक 20 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पारंपारिक खेळाबरोबरच श्री राम, लक्ष्मण, सीता व हनुमान यांचा सजीव देखावा तयार करून संपूर्ण गावातुन भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.
         

उद्घाटन सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष धैर्यशील पाटील लोकनियुक्त सरपंच आकुर्डे, मुख्य अतिथी राजेंद्र सूर्यवंशी माजी सभापती पंचायत समिती करवीर , प्रमुख उपस्थिती रणधीर पाटील जिल्हाप्रमुख शिवसेना शेतकरी सेना, सुरेश पवार, सागर साळुंखे, युवराज बेलेकर, उपसरपंच अनिल पाटील सर, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाटील, भिवाजी पाटील, अक्षय पवार, प्रधान पाटील, ओंकार पाटील, शिवतेज पाटील , सर्व महिला ग्रामपंचायत सदस्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
     

शिवजन्मोत्सव सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन गावातील सर्व शिवभक्तांनी एकत्र येत केले होते. यावेळी गावातील सर्व शिवभक्त तरुण-तरुणी, शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


पन्हाळा तालुक्यातील आकुर्डे येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा पाच दिवसांच्या भव्यदिव्य कार्यक्रमांनी संपन्न