बातम्या

लंडनवरून येणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

Chhatrapati Shivaji Maharaj s tiger coming from London


By nisha patil - 12/7/2024 12:19:45 PM
Share This News:



छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांच्या आस्थेचा, स्वाभिमानाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे.  लंडनहून येणाऱ्या वाघनखांसंदर्भात राज्यातील जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे, असे सांगून ही वाघनखे महाराजांचीच असल्याचा पुरुच्चार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केला.

            सदस्य रणधीर सावरकर यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर . मुनगंटीवार यांनी निवेदन केले.

            ते म्हणाले की, लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयात असलेल्या वाघ नखाबाबत विविध पुरावे उपलब्ध आहेत. लंडनवरून आणण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे प्रदर्शन येत्या १९ जुलै रोजी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात करण्यात येत असून, तेथे स्वागत करण्यात येणार आहे.

           . मुनगंटीवार म्हणाले की, अनेक शिवभक्तांनी छत्रपतीं शिवाजी महाराजांची वाघनखे लंडन मध्ये असून ती भारतात आणावीत अशी मागणी केली. त्यासंदर्भातील काही कागदपत्रे अनेक शिवभक्तांनी पाठवली. व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट संग्रहालयाकडे वाघनखे दिली जाण्या पूर्वी लंडनमध्ये १८७५ व १८९६ या वर्षी झालेल्या एका प्रदर्शनात ही वाघनखे प्रदर्शित झाली होती. त्या प्रदर्शनाच्या बातम्यांची कात्रणेही काही शिवभक्तांनी पाठवली, ज्यात ती वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली असल्याचा उल्लेख त्या प्रदर्शनात केला असल्याचे त्या बातम्यात म्हटले होते. लंडनमधील संबंधित संग्रहालयात अनेक वाघनखे आहेत हे खरे असले तरी केवळ या विशिष्ट वाघनखांनाच १८२५ मध्ये विशेष पेटीचे आवरण बनविण्यात आले आहे आणि त्यावर ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधासाठी वापरल्याचा स्पष्ट उल्लेख आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

            यासंदर्भात अनेक शिवभक्तांनी लंडनमधील संग्रहालय तसेच ब्रिटिश सरकारच्या संबंधित खात्यांशी पूर्वीपासून केलेला पत्रव्यवहार उपलब्ध असून त्याच आधारावर आम्ही पुन्हा लंडनमधील संबंधित संग्रहालय आणि ब्रिटिश पंतप्रधान यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्याचे उत्तर देताना संबंधित संग्रहालयाने हे मान्य केले की ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधासाठी वापरलेली आहेत, असे सांगून मुनगंटीवार म्हणाले की, तरीही आम्ही अनेक इतिहास संशोधकांकडून महिती घेतली की जगात कुठे इतरत्र अशी वाघनखे आहेत का? व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयासोबत आपण केलेल्या पत्रव्यवहारात किंवा बोलणी केली तेव्हाही या संग्रहालयाने कधीही ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचे नाकारले नाही, अशी माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली. त्यानंतर संग्रहालयाने ही वाघनखे आधी एक वर्षाकरता देण्याचा प्रस्ताव दिला, आणि पुन्हा बोलणी केल्यानंतर ही वाघनखे तीन वर्षांकरता देण्याचे त्यांनी मान्य केले, असे श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

दि. १९ जुलै पासून साताऱ्यात वाघनखांचे प्रदर्शन

लंडनवरून येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखे येत्या दि. १९ जुलै पासून साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात प्रदर्शित केली जाणार असून जनतेला त्याचे दर्शन घेता येईल. या सोबतच या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्त्रे प्रदर्शित करणाऱ्या एका शस्त्र दालनाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे, असेही  मुनगंटीवार म्हणाले. या कार्यक्रमांसाठी सर्व विधिमंडळ सदस्य आणि सर्व शिवप्रेमी सादर निमंत्रित आहेत, असेही ते म्हणाले.

वाघनखे आणण्याकरता केलेला खर्च नगण्य, चुकीच्या माहितीवर जनतेने विश्वास ठेवू नये

            वाघनखे आणण्याकरता एक नवीन पैशाचेही भाडे दिले जाणार नाही असे श्री. मुनगंटीवार म्हणले. यासंदर्भातील अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी केले. ही वाघनखे आणण्याकरिता १४ लाख आठ हजार रुपयांचा खर्च करार करण्याकरता झाला आहे, अशी माहितीही . मुनगंटीवार यांनी दिली.

            त्याचबरोबर ही वाघनखे ठेवण्याकरता खर्च केला जात नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व शस्त्रांचे जे प्रदर्शन आपण चार ठिकाणी उभे करीत आहोत, त्या - त्या संग्रहालयांचे नूतनीकरण आणि डागडुजी याकरता ७ कोटी (अक्षरी सात कोटी) इतका खर्च झालेला आहे, असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

शिवराज्याभिषेकाच्या संदर्भातील एक पुस्तिका लवकरच तयार करण्यात येईल, ज्यातून सर्व शंकांचे निरसन होईल, असेही  मुनगंटीवार यावेळी म्हणाले.


लंडनवरून येणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार