बातम्या
आवड आणि क्षमता लक्षात घेऊन योग्य करिअर निवडा- प्राचार्य डॉ. महादेव नरके यांचे आवाहन
By nisha patil - 6/6/2024 9:39:12 PM
Share This News:
दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी करिअरची वाट निवडताना आपली आवड आणि क्षमता लक्षात घेऊन योग्य मार्ग निवडावा, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केले.
कसबा बावडा येथील डॉ. डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या वतीने "दहावी नंतर करीअरच्या संधी आणि डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया " या विषयावर कार्यशाळेत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यशाळेत एडमिशन प्रमुख उपप्राचार्य प्रा. नितीन माळी यांनीही विद्यार्थ्यांना टीप्स दिल्या.
डॉ. नरके म्हणाले की, प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याचे उज्ज्वल भवितव्य घडावे, अशी अपेक्षा असते. त्यादृष्टीने पालक आणि विद्यार्थी वेगवेगळ्या शाखांची माहिती घेत असतात. पण सध्या कोणत्या शाखेला स्कोप आहे ? हा प्रश्नही पालक आणि विद्यार्थ्यांकडून वारंवार विचारला जातो. असे असले तरी आवड आणि क्षमता या दोन्ही गोष्टींचा मिलाफ झाल्यास एखाद्या क्षेत्रामध्ये चांगले करिअर करता येते.पालकांनी आपल्या अपेक्षा पाल्यावर लादू नयेत.उलट त्यांना जास्तीत जास्त क्षेत्रांची माहिती उपलब्ध करून देऊन त्यांचा करीअर मार्ग सोपा करावा. डिप्लोमा इंजिनिअरिंग ला प्रवेश घेतल्यानंतर तीन वर्षानंतर नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रा. नितीन नितीन माळी यांनी दहावीनंतरच्या वेगवेगळ्या करीअर संधीबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच डिप्लोमा इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रिया आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे या बद्दल मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध स्कॉलरशिप बद्दल सुद्धा माहिती दिली. या कार्यशाळेला पालक आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यशाळेला संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील,कार्यकारी संचालक डॉ. ए.के गुप्ता यांचे सहकार्य लाभले. यावेळी मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. महेश रेणके, सिव्हिल विभाग प्रमुख प्रा. अक्षय करपे ,प्रथम वर्ष समन्वयक प्रा.एस.बी.शिंदे, कॉम्प्युटर विभागप्रमुख प्रा.शीतल साळोखे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.राज आलास्कर यांनी तर आभार प्रा.संदीप पाटील यांनी मानले.
आवड आणि क्षमता लक्षात घेऊन योग्य करिअर निवडा- प्राचार्य डॉ. महादेव नरके यांचे आवाहन
|