बातम्या

कोल्हापूर महापालिकेच्या आंधळ्या कारभारावर नागरिक संतप्त

Citizens are angry about the blind management of Kolhapur Municipal Corporation


By nisha patil - 6/21/2023 5:18:23 PM
Share This News:



कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूर शहरात पिण्याच्या पाण्याचा अक्षरश: ठणठणाट असल्याने पाणी नियोजनाचा मात्र बोजवारा उडाला आहे. आंधळं दळतय अन् कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था कोल्हापूर मनपा प्रशासनाची  झाली आहे. कोल्हापूर शहरात  गेल्या तीन आठवड्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झालेला असतानाच शहरातील शाहू मिल कॉलनी परिसरात आज भलताच प्रसंग घडला. या परिसरातील पाण्याची टाकी फुल्ल होऊन थेट लोकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे  संपूर्ण परिसर जलमय होऊन गेला. कोल्हापूर शहरामध्ये पाणीबाणी सुरू असताना अशा पद्धतीने पाण्याचा अपव्यय योग्य आहे का? अशी विचारणा नागरिकांकडून करण्यात येत आहे.शाहू मिल काॅलनी परिसरात लोकांच्या घरात पाणी शिरून परिसर जलमय झाला, तरी मनपा प्रशासनाचे डोळे उघडले नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. हजारो लिटर पाणी महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे वाया गेलं आहे. शहराच्या पाणी उपसा करण्यावर विपरित परिणाम झाल्याने एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर अनेक भागात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.  
कोल्हापूर शहरात सध्या दिवसाआड पाणी पुरवठा मनपा प्रशासनाकडून केला जात आहे. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंचगंगा आणि भोगावती नदीने तळ गाठल्याने पुरेसा उपसा होत नसल्याने पाणी संकट ओढवले आहे. धरणांनी सुद्धा तळ गाठला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये पाण्याच्या काटकसरीची वेळ आली आहे. पाणी जपून वापरा असे सातत्याने आवाहन मनपा प्रशासनाकडून केलं जात असताना महापालिकेचा मात्र भोंगळ कारभार समोर आला आहे.
दुसरीकडे, कोल्हापूर शहरात दिवसाआड पाणी देऊनही अनेक भागात पुरेसा पुरवठा झाला नसल्याने विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे नागरिकांची टँकर्सची सुद्धा मागणी वाढू लागली आहे. दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्यानतंर शहरात 25 ते 30 फेऱ्या होत होत्या. तोच आकडा आता 31 च्या घरात गेला आहे. उन्हाचा तडाखा त्यात लांबत चाललेला पाऊस यामुळे कोल्हापूर शहरात पाण्याची समस्या वाढत चालली आहे.


कोल्हापूर महापालिकेच्या आंधळ्या कारभारावर नागरिक संतप्त