बातम्या
राज्यात १३ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता: २६ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार
By nisha patil - 9/10/2024 3:33:33 PM
Share This News:
राज्यात विधानसभेच्या निवडणुका वेळेत पार पाडण्यासाठी १३ ऑक्टोबरपासून निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. नवीन सरकार २६ नोव्हेंबरपर्यंत स्थापन होईल, अशी अपेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर आज (८ ऑक्टोबर) महायुती सरकारची कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली आहे, जी सरकारच्या चालू कार्यकाळातील शेवटची कॅबिनेट ठरू शकते.
मागील आठवड्यात मंत्रिमंडळाच्या सलग दोन बैठकांनंतर, आजच्या कॅबिनेटमध्ये १०० हून अधिक विषयांवर चर्चा होणार आहे. यामध्ये विविध योजना जाहीर होण्याची शक्यता आहे. १३ ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाल्यानंतर दिवाळीनंतर मतदान होईल आणि नोव्हेंबरअखेरपर्यंत नवीन सरकार सत्तेत येण्याची शक्यता आहे.
निवडणुकीसाठी साधारण ३५ दिवसांचा कार्यक्रम:
राज्यातील नवीन सरकार २६ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी साधारणत: ३० ते ३५ दिवसांचा कालावधी लागतो.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर तयारी: ५-६ दिवस
उमेदवारी अर्ज भरणे: ७ दिवस
अर्ज छाननी आणि अंतिम यादी: १ दिवस
अर्ज माघार: २ दिवस
प्रचार: १२-१५ दिवस
मतदान आणि निकाल: ३-४ दिवस
सरकार स्थापनेसाठी वेळ: १०-१२ दिवस
सर्व मंत्रालयांमध्ये सध्या हालचाली गतिमान असून, राज्याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात १३ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता: २६ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होणार
|