बातम्या

41 दिवसांनी आचारसंहिता लागू होणार; उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं, भगवा सप्ताहाची घोषणा...

Code of Conduct will come into effect after 41 days


By nisha patil - 7/20/2024 4:12:04 PM
Share This News:



लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यातच, नुकतेच राज्यातील महायुती सरकारचे यंदाच्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन पार पडले. त्यामध्ये, विविध घोषणा करत सर्वसामान्य जनतेला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. त्यात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करुन महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय झाला असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यावरुन, विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजही या योजनांवरुन सरकारला लक्ष्य केलं. त्यानंतर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सेनाभवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीतून उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं रणशिंगच फुंकलं आहे. 

भाजपने विधानसभा निवडणुकांसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचीही तयारी केली आहे. तर, सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकांसाठी कामाला लागले असून पदाधिकारी मेळावा आणि कार्यकर्त्यांसाठी बैठकांचं आयोजनही केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज उद्ध ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पक्षाच्या विधानसभा संपर्कप्रमुखांचा मेळावा घेतला. त्यामध्ये, पुढील 41 दिवसात आचार संहिता लागेल, त्यामुळे जोमाने काम करा, असे निर्देशच उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकताना आचारसंहिता कधी लागू होणार, याची तारीखच सांगितली आहे. 

शिवसेना ठाकरे गटाकडून 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत भगवा सप्ताहाचे आयोजन करण्याचेही विधानसभा संपर्कप्रमुखांना सांगण्यात आलं आहे. या भगवा सप्ताहमध्ये विधानसभा क्षेत्राचा आढावा घेऊन त्याची माहिती सेनाभवन येथे सादर करायची आहे. त्यामध्ये विविध कार्यक्रम आढावा बैठका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील 4 महिन्यात पंधरा दिवसातून दोन दिवस विधानसभा क्षेत्रात संपर्कप्रमुखांनी स्वतः उपस्थितीत राहून आढावा घेण्याचे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांना केले आहे.


41 दिवसांनी आचारसंहिता लागू होणार; उद्धव ठाकरेंनी विधानसभेचं रणशिंग फुंकलं, भगवा सप्ताहाची घोषणा...