बातम्या

जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

Collector Amol Yedge appealed to more and more citizens of the district to benefit


By nisha patil - 8/27/2024 9:28:09 PM
Share This News:



 प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेत जिल्ह्यातील १ हजार ८८२ वीज ग्राहकांच्या छतांवर सौर पॅनेलच्या माध्यमातून वीज निर्मिती सुरू झाली आहे तर ४ हजार १० वीज ग्राहकांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. वापराएवढी वीजनिर्मिती होत असल्याने त्यांचे वीज देयक शून्यापर्यंत कमी झाले आहे. या पर्यावरणपूरक योजनेचा जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांनीही आवर्जून या योजनेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली योजनेच्या समितीची बैठक नुकतीच झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., ‘महावितरण’चे अधिक्षक अभियंता गणपत लटपटे, कार्यकारी अभियंता प्रशांतकुमार मासाळ व जिल्हा अग्रणी बँकांचे गणेश गोडसे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले की, ऊर्जा क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारी ही योजना आहे. जिल्ह्यात अधिकाधिक नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच योजने अंतर्गत जिल्ह्यात ‘मॉडेल व्हिलेज’ करण्याच्या दृष्टीने विविध गावांची पाहणी करावी. जिल्ह्यात योजना व्यापकपणे राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत भाग घेणा-या नागरिकांना प्रति किलोवॅट ३० हजार याप्रमाणे प्रथम दोन किलो वॅटसाठी ६० हजार आणि तिस-या किलोवॅटसाठी १८ हजार असे एकुण ७८ हजारांचे अनुदान केंद्र शासनामार्फत थेट ग्राहकांच्या खात्यात जमा करण्यात येते. या योजनेकरिता बँकेमार्फत नागरिकांना कर्जही देण्यात येते, असे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी सांगितले.

महावितरणकडून योजनेचा जागर

जिल्ह्यात योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘महावितरण’कडून गावोगावी जाऊन बॅनर्स, फलक आदी माध्यमातून योजनेचा प्रसार करण्यात येत आहे. तसेच नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात होणाऱ्या ग्रामसभेत या योजनेची माहिती देण्यात आली आहे. योजनेत सहभागी होणा-या ग्राहकांना महावितरणकडून सर्व प्रकारचे तांत्रिक सहकार्य करण्यात येत आहे. तसेच या योजनेच्या अंमबजावणीची सुरुवात स्वतःपासून करण्याच्या दृष्टीने महावितरणने यापूर्वीच आपल्या कर्मचाऱ्यांना या योजनेत सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. 


जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन