बातम्या
न्यू शाहूपुरी व नागाळा पार्क प्रभागातील रस्ते कामाचा शुभारंभ : एक कोटीचा विकास निधी
By nisha patil - 5/29/2023 4:22:44 PM
Share This News:
कोल्हापूर : प्रतिनिधी विरोधकांचा अजेंडा वेगळा आहे. तर आम्ही कोल्हापूर शहराच्या विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहे. कोल्हापूरची जनता नेहमीच विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. तरीही यापूर्वी मंजूर केलेली विकासकामे करण्यासाठी ही संघर्ष करावा लागतो, हे दुर्दैव आहे असे मत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर महापालिका अंतर्गत न्यू शाहूपुरी व नागळा पार्क प्रभागातील रस्ते कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. आमदार जयश्री जाधव व आमदार ऋतुराज पाटील प्रमुख उपस्थित होते.
आमदार सतेज पाटील म्हणाले, एप्रिल पर्यंत आम्ही बॅटिंग करीत होतो. तेव्हा कोल्हापूर शहराच्या विकासासाठी भरघोस निधी आणला. आत्ता आम्हाला फिल्डिंग करावी लागत आहे. मात्र आम्ही आणलेल्या निधीतही आडकाटी घालण्याची धोरण सत्ताधाऱ्यांचे आहे. जनतेतून निवडून आलेल्या आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव यांनी सुचवलेली विकास कामे प्रशासन करत नाही मात्र जनतेने नाकारलेलेची कामे होत आहेत. गेल्या अडीच वर्षापासून महापालिकेत नगरसेवक नाही. इतरत्र सर्व निवडणुका होत आहेत. मात्र महापालिकेच्या निवडणुका घेण्यास सरकार घाबरत आहे.
आम्ही रस्त्यांच्या कामासाठी मंजूर करून आणलेला निधी रद्द करून, तो निधी बाकडी आणि ओपन जिमसाठी वळवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. यामधून 40% चा कर्नाटकी पॅटर्न कोल्हापुरात येऊ पाहत असल्याचा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला.
विधानसभा पोटनिवडणुकीच्या वेळी या भागातील नागरिकांशी संवाद साधला होता. यावेळी या रस्त्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार आज या विकास रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होत आहे. विकास कामाची वचनपूर्ती करताना मनस्वी आनंद असल्याचे आमदार जयश्री जाधव यांनी सांगितले.
यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर यांचे भाषण झाले. यावेळी अनुग्रह हॉटेल ते आयुक्त बंगला ते निवडणूक कार्यालय या रस्त्याच्या लादीकरण व डांबरीकरण कामाचा आणि नागाळा पार्क प्रभागातील हॉटेल पाटील वाडा ते ध्रुव रेसिडन्सी रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. या दोन्ही कामासाठी काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांच्या पाठपुराव्यातून प्रत्येकी 50 लाख असा एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
यावेळी गटनेते शारंगधर देशमुख, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, अर्जुन माने, प्रसाद कामत, दिलीप शिर्के, संजय घाटगे, राजेश घाटगे, दिपाली राजेश घाटगे, तनुजा संजय घाटगे, तनुजा प्रसाद कामत, दिलीप बनसोडे, सुनील भांडवले, वासिम मुजावर, मंगेश भोसले, सुरेश कारीदकर, अशोक गवळी, महेश गवळी, विक्रम गवळी, चंद्रकांत वाकळे, संदीप बोरचाटे, बॉबी भांडवले, सचिन शिंदे, आप्पासाहेब चव्हाण, दिग्विजय चरणकर, प्रसाद लिमये, श्री. शिंदे, बी. एस. पाटील, राजेश गायकवाड, सचिन बनगाडे, ध्रुव जोशी, मनोज लकोटिया, दीपक लालवाणी, रमेश लालवाणी, मोहन जाधव, दत्ता हजारे यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यू शाहूपुरी व नागाळा पार्क प्रभागातील रस्ते कामाचा शुभारंभ : एक कोटीचा विकास निधी
|