बातम्या

गट “क” मधील पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवा

Conduct recruitment process for Group C posts through Maharashtra Public Service Commission


By nisha patil - 11/7/2024 3:32:39 PM
Share This News:



गट “क” मधील पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवा

-आमदार सतेज पाटील यांची मागणी, प्रस्ताव विचाराधीन मुख्यमंत्र्यांची ग्वाही

  शासकीय सेवेतील गट “क” वर्गाच्या पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबविण्याबाबत सन २०२२मध्ये सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याचां निर्णय होऊनही  त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या पदांच्या भरती प्रक्रियेतील  गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली. याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, गट "क" संवर्गाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले. 


आमदार सतेज पाटील यांनी तारांकित प्रश्नद्वारे विधान परिषदेत गट क वर्ग भरती प्रक्रियाचा मुद्दा मांडला. या पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबविण्याकरीता सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यासाठी सन २०२२ मध्ये निर्णय झाला. मात्र, ही प्रक्रिया खाजगी कंपनीमार्फत सुरु आहे. शिक्षक, तलाठी, आरोग्य इ. विविध परिक्षांमध्ये होणाऱ्या पेपरफुटी व गैरव्यवहारांच्या प्रकरणामुळे सदर परीक्षा ह्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्याची मागणी विविध विद्यार्थी संघटनांनी केली आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेत होणाऱ्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट “क” वर्गाची भरती करण्याबाबतच्या अंमलबजावणीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली असा सवाल आमदार पाटील यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले, शासन निर्णय दिनांक ०२/११/२०२२ नुसार गट क मधील फक्त लिपिक वर्गीय पदे महाराष्ट्र सेवा आयोगाच्या कक्षेत आणली आहेत.  प्रथम टप्प्यात लिपिक टंकलेखकची पदे आयोगामार्फत भरण्यात येत आहेत. अन्य पदांच्या पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षा सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय दिनांक २१/११/२०२२ मध्ये नमूद केलेल्या टि. सी. एस. आयओएन व आय.बी.पी.एस. या खाजगी कंपन्यांमार्फत घेण्यात येत आहेत. या गटातील विविध परीक्षा आयोगा मार्फतच घ्याव्या अशी मागणी होत असून गट "क" संवर्गाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले आहे.


गट “क” मधील पदांची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राबवा