बातम्या

स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, अभ्यासात सातत्य, कठीण परिश्रम आवश्यक

Confidence consistency in studies


By nisha patil - 5/12/2023 10:51:59 PM
Share This News:



स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, अभ्यासात सातत्य, कठीण परिश्रम आवश्यक 

 -उपविभागीय अधिकारी अजय शिंदे

 जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पर्धा परीक्षा मोफत कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर, दि. 5 (जिमाका):  आपल्या अंगची बलस्थाने ओळखून ती विकसित करा. स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यास खचून न जाता आत्मविश्वास बाळगून अभ्यासात सातत्य ठेवा.
त्या त्या परीक्षेचा अभ्यासक्रम पाहून त्यानुसार कठीण परिश्रम व भरपूर सराव केल्यास स्पर्धा परीक्षेत नक्की यश मिळते, असा मूलमंत्र सांगली जिल्ह्यातील कडेगावचे उपविभागीय अधिकारी (उपजिल्हाधिकारी) अजय शिंदे यांनी दिला. 

  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात स्पर्धा परीक्षा मोफत मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढण्याच्या हेतूने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या या मार्गदर्शन शिबिराला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी करवीरचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार स्वप्नील रावडे, तहसीलदार महेश खिलारे, निवासी नायब तहसीलदार भालचंद्र यादव, परिविक्षाधीन नायब तहसीलदार स्वप्नाली घाईल, माहिती अधिकारी वृषाली पाटील आदी उपस्थित होते. 

कौटुंबिक पार्श्वभूमी आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यापर्यंतचा प्रवास उलगडून उपविभागीय अधिकारी श्री. शिंदे म्हणाले, स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याची पहिली पायरी म्हणजे त्या त्या परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम नीट पहा. त्यानुसार अभ्यासाचे योग्य नियोजन करुन आवश्यक पुस्तकांची निवड करुन झोकून देऊन अभ्यास करा. मोबाईल आणि सोशल मीडियामध्ये वेळ न दवडता त्याचा वापर केवळ अभ्यासासाठी करुन घ्या, असे सांगताना 'परीक्षेमध्ये यशस्वी होईपर्यंत मी सोशल मीडियाचा वापर अत्यंत कमी प्रमाणात केल्याचे' त्यांनी सांगितले. शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकांचा अभ्यास चांगला करा. ग्रामीण भागातील शिक्षण, आपले राहणीमान, भाषेबद्दल न्यूनगंड अथवा भीती बाळगू नका. स्वतःमधील चांगले गुण ओळखून आपल्यातील कौशल्यांचा विकास करा. करिअर म्हणून केवळ स्पर्धा परीक्षेवर विसंबून न राहता यामध्ये अपयश आल्यास करिअरचा प्लॅन बी तयार ठेवा, असा मूलमंत्र त्यांनी दिला. 

उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक म्हणाले, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अभ्यासक्रम पाहून त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करा. मुलाखतीची तयारी करताना स्वतःचा बायोडाटा मजबूत करा. तुमच्या आवडीनिवडी, छंद तसेच अंगी असणाऱ्या विविध कौशल्यांचा समावेश बायोडाटामध्ये करा. जेणेकरुन मुलाखतीला चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकाल.

  अभ्यासात सातत्य ठेवा. चिकाटी ठेवा. सुरुवातीपासून नियोजनबद्ध अभ्यास करा. प्रश्नपत्रिकांच्या सरावावर भर द्या. महाराष्ट्र राज्य मंडळ (स्टेट बोर्ड) व एनसीईआरटी पुस्तकांचा अभ्यास ठेवा, असे आवाहन तहसीलदार महेश खिलारे यांनी केले.

  स्पर्धा परीक्षांमध्ये वाढत जाणारी स्पर्धा, यशस्वी होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपली पदवी परीक्षा चांगल्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा. दररोज किमान आठ तास अभ्यास करा. यशाचे कोणतेही सूत्र नसून त्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध मान्यवरांचे, तज्ञांचे मार्गदर्शन ऐकून त्यातून आपल्या यशाचे सूत्र स्वतः तयार करावे, असा सल्ला तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी दिला.

    उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आदी पदांबरोबरच कृषी, आरोग्य सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आदी विविध शासकीय विभागांमध्येही वर्ग एक, वर्ग दोन दर्जाच्या पदांची निवड स्पर्धा परीक्षेद्वारे केली जाते. त्याचबरोबर पत्रकारितेची पदवी उत्तीर्ण होवून माहिती व जनसंपर्क विभागामध्येही अधिकारी पदाची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांनी त्यादृष्टीने माहिती घेवून परीक्षांची तयारी करावी, असे मत माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

 शासनाच्या विविध विभागातील संधी, त्यासाठी होणाऱ्या परीक्षा, आवश्यक पात्रता, परीक्षेची प्राथमिक तयारी व अभ्यासाची सुरुवात, वाचनासाठीची पुस्तके, परीक्षेची तयारी, अभ्यासाची पध्दत, अभ्यासाचे नियोजन आदींबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मान्यवरांनी उत्तरे दिली.  

  निवासी नायब तहसीलदार भालचंद्र यादव यांनी आभार मानले.


स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास, अभ्यासात सातत्य, कठीण परिश्रम आवश्यक