बातम्या

उच्च शिक्षणातील सल्लागार, मार्गदर्शक, दीपस्तंभ: प्राचार्य सुधाकर मानकर सर.

Consultant Guide Lighthouse in Higher Education


By nisha patil - 12/23/2023 4:46:47 PM
Share This News:



उच्च शिक्षणातील सल्लागार, मार्गदर्शक, दीपस्तंभ: प्राचार्य सुधाकर मानकर सर. 

75 व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात त्यांच्या सत्काराचे  आयोजन. 
   
गेल्या पन्नास वर्षात उच्च शिक्षणातील विविध प्रश्नांवरील लढ्यात अग्रभागी असणारे, जागतिक प्राध्यापक महासंघाचे पाच वर्षे उपाध्यक्ष म्हणून काम केलेले, अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाच्या माध्यमातून विद्यापीठ अनुदान आयोग आणि मानव संसाधन मंत्रालयाला मार्गदर्शन केलेले, वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी 165 पुस्तकांचे लेखन करणारे लेखक व उच्च शिक्षणातील विविध शासकीय अध्यादेश मिळवून 24 पुस्तकांचे संपादन करून महाराष्ट्र,देशातील प्राध्यापकांना, विद्यापीठ स्तरावरील अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्राचार्य, प्रा. सुधाकर मानकर सर होय. त्यांनी उच्च शिक्षणामध्ये 39 वर्षे प्राध्यापक म्हणून सेवा बजावली. वयाच्या 75 व्या वर्षातही ते उच्च शिक्षणातील विविध प्रश्नांवर मोफत सल्ला देण्याचे काम अखंड आणि निरपेक्षपणे करत आहेत. त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग मंत्रालयातील सचिवापासून ते अनेक कुलगुरू, प्राचार्य, प्राध्यापक, हजारो विद्यार्थ्यांना झालेला आहे. त्यांच्या वयास नुकतीच 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा रविवारी कोल्हापुरात अमृत महोत्सवी सत्कार ठेवलेला आहे .अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा परिचय नव्या पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरेल,यासाठी हा थोडक्यात लेखन प्रपंच 
   

सुधाकर मानकर सरांची जन्मभूमी अमरावती मधील. 21 डिसेंबर 1948 चा त्यांचा जन्म. अत्यंत सधन अशा कुटुंबात त्यांच बालपण गेले. 1979 साली सरांनी नागपूरच्या जीएस कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून प्रथम श्रेणीत पदवी संपादन केली. त्यांना एकाच वेळी प्राध्यापक म्हणून नोकरीचे चार महाविद्यालयातून बोलावणे आले. पुणे विद्यापीठातील नाशिक जवळील संलग्नित महाविद्यालयात पाच वर्षे त्यांनी प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे काम केले. त्यानंतर त्यांना कोल्हापुरातील रंकाळ्यावरील शालिनी पॅलेस या राजवाड्यातील श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात कॉमर्स विभागाकडे प्राध्यापक म्हणून त्यांना नेमण्यात आले. 1974 -75 साली श्रीपतराव बोंद्रे दादा आणि प्राचार्य आबासाहेब शिंदे यांनी मानकर सरांच्या बरोबरच डॉक्टर जयसिंगराव पवार, प्रा. के. एच. ठक्कर,,प्रा.पंगु,प्रा.केचे, प्रा. चंद्रकुमार नलगे प्रा.रघुनंदन वराडकर, डॉ. नशिराबादकर, डॉ. रजनी भागवती यांच्यासह दहा नवीन प्राध्यापकांची एकाच वेळी नियुक्ती केली.

त्यांच्या अध्ययन अध्यापनाच्या प्रभावामुळे या महाविद्यालयातील विद्यार्थी संख्या दुसऱ्याच वर्षी 170 वरून 700 वर गेली तर तिसऱ्या वर्षी ती 1500 वर गेली. त्यांनी या शहाजी महाविद्यालयात 34 वर्षे अखंडपणे, प्रामाणिकपणे अध्यापनाचे कार्य केले.      दरम्यान त्यांनी अमरावतीच्या बडनेर महाविद्यालयात प्रमोशन वरती दोन वर्षे प्राचार्य म्हणूनही काम केले. त्यावेळीचे मंत्री राम मेघे यांनी  मंत्री श्रीपतराव बोंद्रे दादा यांना सांगून त्यांना प्रमोशन वरती बडनेर महाविद्यालयाच्या जडन घडणीसाठी त्यांना बडनेरला बोलावून घेतले..तिथेही त्यांनी उत्तम काम केले. 
   

 कोल्हापुरात आल्यानंतर मानकर सरांना शहाजी महाविद्यालयातील उपप्राचार्य संभाजीराव जाधव यांचा  सहवास व मार्गदर्शन लाभले. त्यांच्या सहकार्याने,मार्गदर्शनाखाली सरांनी शिवाजी विद्यापीठ प्राध्यापक संघटनेतील कार्यात स्वतःला झोकून दिले. 1974 पासून ते आज पर्यंत अखंडपणे कार्य ते करीत आहेत. 
   

सुरुवातीला सुटा संघटनेचे सदस्य, जिल्हाध्यक्ष, सचिव, महाराष्ट्र पातळीवरील एम फुकटो प्राध्यापक संघटने मधील विविध पदांवर त्यांनी काम करून महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाविषयी प्रश्नांच्या सोडवण्यासाठी हिरीरीने काम केले. पुढे बारा वर्षे अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाचे त्यांनी जनरल सेक्रेटरी म्हणून हे काम केले. या कालावधीत त्यांनी युजीसी आणि भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातील उच्च शिक्षणाविषयी विविध  प्रश्नांच्या सोडवण्यासाठी, नवीन धोरणे आणि उच्च शिक्षणाची वाढ व विकास यासाठी अखंडपणे मार्गदर्शन केले. 
 

 यातूनच त्यांनी महाविद्यालयातील ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालकांना शिक्षक समकक्षता मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी युजीसी कडे दहा बैठका घेऊन याचा पाठपुरावा केला. 
 सुरवातीला प्राध्यापकांना 300 ते 600 अशी वेतन श्रेणी होती. त्यांना प्रमोशन नव्हते.  प्रमोशन आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मानकर सरांनी अखंड कार्य केले. या कार्यासाठी कोलकत्याचे अशोक बरमन, मृण्मय भट्टाचार्य, ओरिसाचे गोपाल नंदा, हैदराबादचे विजयकुमार, चंदिगडचे एन. के. तिवारी, कोल्हापूरचे संभाजीराव जाधव आणि इतर  सहकाऱ्यांची मोठी साथ मिळाली. यामुळे प्राध्यापकांच्या वेतनश्रेणी प्रश्न मार्गी लागला, उच्च शिक्षणात विद्यार्थी संख्या वाढली.
   सरांना पुढे जागतिक प्राध्यापक महासंघाचे पाच वर्षे उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 2010 ते 2015 या कालावधीत त्यांनी जागतिक पातळीवरील युनोस्को सारख्या जागतिक संस्थांना उच्च शिक्षणाच्या बाबतीत, विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले. याचा उपयोग विकसनशील आणि गरीब राष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या वाढीसाठी झाला. 
   हे कार्य करीत असताना त्यांनी लेखनाची सवय ही स्वतःला जडवून घेतली. 1994 पासून त्यांनी वाणिज्य शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी 165 पुस्तकांचे लेखन केले. या पुस्तकांमुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी, प्राध्यापक घडले. यातून मिळणारा मोबदला थोडका होता परंतु वाणिज्य शाखेत विद्यार्थी शिकण्यासाठी आणि ते पुढे जाण्यास या पुस्तकांमध्ये प्रोत्साहन मिळाले. विद्यार्थ्यांन बरोबर ग्रामीण भागातील प्राध्यापकांना या पुस्तकाचा मोठा लाभ झाला. महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये यातील काही पुस्तके संदर्भ पुस्तके म्हणून निवडण्यात आलेली आहेत. याबरोबरच त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोग केंद्र, राज्य सरकारच्या उच्च शिक्षणाविषयक अध्यादेशांचेही प्राध्यापक विश्वच्या माध्यमातून प्रसारण केले.सुमारे 35 वर्षे त्यांनी प्राध्यापक विश्व या नियतकालिकाच्या संपादक पदाची जबाबदारी सांभाळली आहे.या सर्व संकलित झालेल्या शासकीय जीआर चे त्यांनी 24 पुस्तकात संपादन केले आहे..ही सर्व पुस्तके मंत्रालयातील सचिवापासून ते सर्व महाविद्यालयातील प्राचार्य, प्रबंधकांच्या पर्यंत संदर्भासाठी उपलब्ध आहेत. यातून विद्यार्थ्यांच्या बरोबर, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यापीठातील पदाधिकारी, अधिकारी व शासनाच्या अधिकारी यांनाही संदर्भ मूल्य असणारा दस्तऐवज मिळाला आहे. तसेच त्यांनी कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्व विकास यावरही दोन पुस्तके मराठीत, इंग्रजी भाषेतून प्रसिद्ध केलेले आहेत.  
   शहाजी महाविद्यालयातील नॅकच्या पहिल्या मूल्यांकनात समन्वयक म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले व महाविद्यालयाला उच्च श्रेणी मिळवून देण्यात त्यांचा सहभाग राहिला
   हे कार्य करत असताना त्यांनी मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष दिले.त्यांच्या दोन्हीही मुली उच्च विद्या विभूषित असून दोन्हीही जावई चांगल्या ठिकाणी कार्यरत आहेत. 
 त्यांचा मुलगा डॉक्टर अतुल हे आयुर्वेदामध्ये एम.डी.असून त्यांनी आयुर्वेदातील पीएच.डी.पदवी  संपादन केलेली आहे. त्यांनी दोन आयुर्वेदिक महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून ही काम केलेले आहे. सुनबाई दिपती याही बीएएमएस व  एम.डी.आयुर्वेदामध्ये आहेत. त्यांचाही स्वतंत्रपणे वैद्यकीय व्यवसाय आहे. सरांना सहा नातवंडे व मोठा कौटुंबिक परिवार आहे. सर्वांच्या विकासासाठी ते सतत मार्गदर्शकाची भूमिका निभावतात .
या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये सरांना श्रीपतराव बोंद्रे दादा, डॉ. जयसिंगराव पवार, प्रा. संभाजीराव जाधव , प्राचार्य डॉ. आबासाहेब शिंदे, प्राचार्य डॉ. वामन कटांबळे , प्राचार्य डॉ.डी.आर.मोरे, डॉ.आर.के.शानेदिवाण यांचाही त्यांना सहवास लाभला, आई-वडिलांची, पत्नीची ही त्यांना चांगली साथ लाभली.त्यांचा महाविद्यालयामध्ये आणि महाविद्यालयाच्या बाहेरी मोठा मित्रपरिवार  आहे. विद्या विनयन शोभते असे नम्र व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. मानकर सर होय. उच्च शिक्षणातील ते चालते बोलते विद्यापीठ आहे , त्यांच्या कुटुंबियाच्या वतीने त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार रविवारी ठेवण्यात आलेला आहे. यानिमित्त सर्वांच्या वतीने त्यांना निरोगी आयुष्यासाठी आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग समाजाला आणखीन होण्यासाठी दीर्घायुष्य लाभो अशी हृदयपूर्वक सर्वांच्या वतीने शुभेच्छा...
डॉ. पांडुरंग पाटील ,ग्रंथपाल
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर.


उच्च शिक्षणातील सल्लागार, मार्गदर्शक, दीपस्तंभ: प्राचार्य सुधाकर मानकर सर.