बातम्या

कोल्हापूर -तिरुपती थेट विमान सेवा पूर्ववत सुरु ठेवा -आमदार सतेज पाटील

Continue Kolhapur Tirupati direct flight service  MP Satej Patil


By nisha patil - 11/25/2023 11:25:52 PM
Share This News:



कोल्हापूर -तिरुपती थेट विमान सेवा पूर्ववत सुरु ठेवा -आमदार सतेज पाटील
-विमानवाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना लक्ष घालण्याची विनंती

कोल्हापूर -तिरुपती थेट विमान सेवा रद्द करण्याच्या निर्णयामुळे पर्यटक व प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यामुळे इंडिगो कंपनीने या निर्णयावर फेरविचार करून ही सेवा पूर्ववत सुरु करावी. केंद्रीय विमानवाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याप्रश्नी लक्ष घालून सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी कॉंग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते,  माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.

   इंडिगो कंपनीकडून कोल्हापूर ते तिरुपती विमान थेट विमानसेवा सुरू आहे. मात्र 14 डिसेंबरनंतर कोल्हापूर- तिरुपती दरम्यानची थेट उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आता ही विमानसेवा व्हाया हैदराबाद केली जाणार  आहे. या विमान सेवेमुळे कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत आहे. ही सेवा रद्द झाल्यास कोल्हापूरच्या विकासावर परिणाम होणार आहे. याशिवाय कोल्हापूरहून थेट तिरुपतीला जाणारे विमान व्हाया हैदराबाद जाणार असल्याने तिरुपतीला जाण्याकरिता प्रवाशांना अधिकचा चार तासाचा वेळ लागणार असून  तिकिटामध्येही वाढ होणार आहे. 

  कोल्हापूर ते तिरुपती थेट विमान सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी अनेक भाविक तिरुपतीहुन कोल्हापुरात येतात. त्यांच्यासाठी विमानसेवा ही वेळेची बचत करणारी ठरते. अशातच इंडिगो एअरलाईनसची कोल्हापूर -तिरुपती विमान सेवा रद्द झाल्यास प्रवाशांची मोठी गैर सोय होणार आहे. यात्रेकरू, पर्यटक आणि व्यावसायिक प्रवाश्यांची वाढती मागणी लक्षात घेता कोल्हापूर आणि तिरुपती दरम्यानचा हा मार्ग टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही सेवा सेवा रद्द न करता पूर्ववत सुरू ठेवावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. याबाबत विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी लक्ष देण्याची मागणीही आमदार पाटील यांनी केली असून याबाबतचे ट्विटही त्यांनी केले आहे.


कोल्हापूर -तिरुपती थेट विमान सेवा पूर्ववत सुरु ठेवा -आमदार सतेज पाटील