निरंतर शिक्षण घेणारे प्रा. महादेव पाटील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त
By nisha patil - 5/29/2023 11:47:09 PM
Share This News:
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, दसरा चौक, कोल्हापूर येथे जून 1990 मध्ये पाटील सर सहाय्यक शिक्षक म्हणून रुजू झाले. आजपर्यंत त्यांची सेवा 34 वर्ष पूर्ण झाली आहे. त्यांचे बालपण एका छोट्याशा खेड्यात गेले. त्यांचे मूळ गाव देवडे, तालुका पंढरपूर आहे. उच्च शिक्षणासाठी कोल्हापुरात 1987 साली आले. त्यानंतर ते तेथेच नोकरीला लागले. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या गावीच झाले. पुढे इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण त्यांच्या मावशीकडे बारामतीला झाले. पदवीपर्यंत शिक्षण पंढरपूर येथे झाले. त्यांनी पदवी परीक्षेत 1987 साली शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला. पदवीत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठातील भूगोल विभागात प्रथम श्रेणीने पूर्ण केले आहे.
नोकरी पूर्वी कॉलेज जीवनात स्नेहसंमेलनामध्ये विविध गुणदर्शन, नाटक, गीत गायन व मूक अभिनय यामध्ये उल्लेखनीय सहभाग घेतला होता. मूक अभिनयामध्ये महाराष्ट्रात तृतीय क्रमांक सन 1990 साली मिळाला होता. नोकरीच्या सुरुवातीपासूनच त्यांचे अविरत शिक्षण चालू ठेवले आहे.ते स्वतः एम. ए. भूगोल, एम. ए. इतिहास, एम. एड. एम. फिल. प्रथम श्रेणीने उत्तीर्ण आहेत. एनसीसी चे सी सर्टिफिकेट उत्तीर्ण आहेत. सध्या शिवाजी विद्यापीठात भूगोल विभागात पी.एच.डी. करीत आहेत.
शिक्षकी पेशात सुरुवातीपासूनच अध्ययन- अध्यापनामध्ये नवनवीन प्रयोग करणे, विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून अध्यापन करणे, शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांसाठी पालकांपेक्षाही काही कमी नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. विद्यार्थ्यांना असणाऱ्या अडचणी आणि त्यातून सावरण्यासाठी केलेले मार्गदर्शन अत्यंत मौलिक आहे. गरीब विद्यार्थ्यांची प्रवेश फी देखील त्यांनी भरली आहे. गेली 34 वर्ष त्यांनी आपल्या प्रिय विद्यार्थ्यांमध्ये आपला वेळ घालवला. मौल्यवान ज्ञान व जीवनाचे महत्त्वपूर्ण धडे त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.
पाटील सर एक उत्कृष्ट आणि मेहनती मार्गदर्शक असण्याबरोबरच ते एक समर्पित महाविद्यालयाचे शिक्षक होते. महाविद्यालयातील त्यांच्या संपूर्ण वास्तव्या दरम्यान त्यांनी आपल्या नम्रतेने सर्वांची मने जिंकण्याचा प्रयत्न केला. पाटील सर खूप मेहनती दयाळू आणि त्यांच्या कामात समर्पित आहेत. सरांनी फक्त खायलाच नाही शिकवले तर खाऊ घालायला ही शिकवले तसेच शिक्षण शिकायला नाही तर शिकवून घ्यायलाही शिकवले. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये सरांचा मोलाचा वाटा आहे.
पाटील सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक अभ्यासपूर्वक व अभ्यासेत्तर उपक्रम राबवले आहेत. सरांनी आपल्या नोकरीच्या काळात अनेक अडचणीवर मात करून यशस्वीरीत्या सेवाकाळ पूर्ण केला आहे. सर वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शक म्हणून अनेक वर्ष काम केले. त्यांनी कोल्हापूर बोर्डाचे प्रमुख नियमक म्हणूनही काम केले आहे. पेपर सेटर म्हणूनही काम केले आहे. नवीन पाठ्यक्रम निर्मिती अभ्यास मंडळ समितीवर प्रमुख परीक्षक म्हणून काम केले आहे. सर शिक्षक भारती या शासन मान्य संघटनेचे कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ विभागाचे अध्यक्ष म्हणून गेली दहा वर्षे कार्यरत आहेत. या महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. सध्या ते या महाविद्यालयात कनिष्ठ विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त होत आहेत.
आदरणीय सर म्हणजे एक संघर्षशील व्यक्तिमत्व, निर्भीड, वैचारिक शैली, आदर्श शिक्षक, प्रशासनाची जाण असणारा, कुशल पर्यवेक्षक, अशा अनेक भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. गेल्या अनेक वर्षात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत सरांचा मोलाचा वाटा आहे.
शेवटी सरांविषयी एवढेच म्हणेन की, सरांचा स्वभाव रसाळ, फणसासारखा, आतून गोड व समृद्धीने भरलेल्या जगण्याला तुमच्या,पुन्हा मिळू दे निरोगी आयुष्याची जोड..... ------- डॉ. पांडुरंग पाटील, ग्रंथपाल, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर.
निरंतर शिक्षण घेणारे प्रा. महादेव पाटील प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त
|