बातम्या
मुंबईतही कोरोनाचे वाढते रुग्ण, महापालिका प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन...!
By nisha patil - 12/21/2023 7:02:05 PM
Share This News:
मुंबईतही कोरोनाचे वाढते रुग्ण, महापालिका प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन...!
मुंबई : राज्यासह देशात कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. सध्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. कोविडच्या नव्या JN1 व्हेरीअंटविषयी मुंबई महापालिका आरोग्य विभागाकडून माहिती देण्यात येत आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी दक्षा शाह यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत सूचना दिल्या आहेत. दक्षा शाह यांनी कोरोनाच्या नवीन व्हेरियंटसंदर्भात माहिती देताना सांगितलं की, कोरोनाचा जे एन 1 नावाचा नवा व्हेरीयंट सापडला आहे. मात्र, हा व्हेरीअंट सौम्य स्वरुपाचा आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नका. मुंबई महानगरपालिकेकडून रुग्णांच्या उपचारा संदर्भात सर्व उपाययोजन आणि तयारी करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी दक्षा शाह यांनी सांगितलं की, मुंबई उपाययोजना आणि सुविधांनी सुसज्ज आहे. रुग्णालयातील खाटा, औषधे यांचा आढावा घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार पुढील तयारी सुरु आहे. टेस्टींग करुन नव्या व्हेरीयंटचं संक्रमण तपासण्यात येणार आहे. आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्यात येणार आहेत. नागरिकांनी भीती बाळगण्याची गरज नाही, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
तसेच राज्यासह देशभरात कोरोनाच्या नव्या JN1 व्हेरियंटचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग आणि पालिका प्रशासन सतर्क झालं आहे. दरम्यान, कोरोनाचा नवा JN1 व्हेरियंट सौम्य असल्याने नागरिकांनी घाबरू नका, मात्र काळजी घ्या, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
मुंबईतही कोरोनाचे वाढते रुग्ण, महापालिका प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन...!
|