बातम्या
डी. वाय. पाटील विद्यापीठामध्ये सोमवारपासून नॅनो टेक्नॉलॉजीवरील आंतरराष्ट्रीय परिषद
By nisha patil - 7/2/2024 11:41:26 PM
Share This News:
डी. वाय. पाटील विद्यापीठामध्ये सोमवारपासून नॅनो टेक्नॉलॉजीवरील आंतरराष्ट्रीय परिषद
कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्य सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चच्यावतीने आयोजन १२ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत “नॅनोमटेरियल आणि बायोटेक्नॉलॉजी मेडिकल क्षेत्रामध्ये उपयोग” या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
नॅनोमटेरियल आणि बायोटेक्नॉलॉजी या विषयांमध्ये चालू असलेल्या नवनवीन संशोधनाचा वापर हा वैद्यकीय क्षेत्रात होणे गरजेचे आहे. कोरोना काळानंतर वैद्यकीय क्षेत्रात अनेक महत्त्वाचे संशोधन चालू असून वारंवार उद्भवणारे साथीचे रोग, मधुमेह, क्षयरोग, डेंगू इत्यादी रोगावर प्रभावी व जलद निदान करणारी उपकरणे त्यावरील परिणामकारक लस तयार करणे, याचबरोबर स्टेम सेलचा वापर करून त्रिमिती आकारातील शरीराचे अवयव तयार करणे यांना प्राधान्य देण्यात येत आहे. याचबरोबर सध्या भेडसावत असणाऱ्या ऊर्जा प्रश्नावर हरित हायड्रोजन वायू तयार करणे तसेच वातावरण शुद्धीकरण आणि पाणी शुद्ध करणारी उपकरणे व त्यासाठी लागणारे नॅनोमटेरियल इत्यादी तयार करणे या विषयावर या परिषदेत चर्चा होणार आहे.
या परिषदेमध्ये ऑस्ट्रेलियामधील न्यू कॅसल विद्यापीठाचे डॉ. अजयन वेणू हे बीज भाषण करतील तसेच दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, अबुधाबी, नायजेरिया, तुर्की या देशातून एकूण १५ शास्त्रज्ञ वैद्यकीय बायोटेक्नॉलॉजी आणि नॅनोमटेरियलच्या वापरावरील अद्ययावत संशोधनाचे सादरीकरण करणार आहेत. याशिवाय भारतातील २० नामवंत शास्त्रज्ञ या परिषदेमध्ये भाग घेणार असून एकूण ४४ निमंत्रक शास्त्रज्ञांची भाषणे होतील. यासाठी भारतातील व भारताबाहेरील ३५० संशोधकांनी सहभाग नोंदवला असून भित्तिपत्रकेद्वारे २१० व मौखिक पद्धतीने ६० जणांचे सादरीकरण होणार आहे.
या परिषदेसाठी प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे संयोजक म्हणून तर सहसंयोजक म्हणून डॉ. जयवंत गुंजकर आणि डॉ. मेघनाथ जोशी हे काम पाहत आहेत. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने ही परिषद होत आहे.
डी. वाय. पाटील विद्यापीठामध्ये सोमवारपासून नॅनो टेक्नॉलॉजीवरील आंतरराष्ट्रीय परिषद
|