बातम्या
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला सौर ऊर्जा रूपांतरणासाठी पेटंट
By nisha patil - 6/12/2023 7:30:10 PM
Share This News:
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला सौर ऊर्जा रूपांतरणासाठी पेटंट
कसबा बावडा/ डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांच्या सौर ऊर्जा रूपांतरणसाठी उपयोगात येणाऱ्या ‘कॅडमियम सेलेनाईड रिडूस्ड ग्राफिन ऑक्साईड’ पदार्थाच्या संशोधनाला पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे ३१ वे पेटंट आहे.
संशोधकांनी भारत सरकारच्या पेटंट प्रमाणपत्र कार्यालयात “कॅडमियम सेलेनाईड रिडूस्ड ग्राफिन ऑक्साईड फॉर फोटोईलेक्ट्रोकेमिकल सेल ॲप्लिकेशन” ला पेटंट मिळवण्याबाबत अर्ज सादर केला होता. २३ महिन्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर २८ नोव्हेंबर २०२३ रोजी हे पेटंट मंजूर झाले आहे.
या शोधाअंतर्गत प्रमाणित केलेले नावीन्यपूर्ण संशोधन पुढील २० वर्षासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे पेटंट स्वरूपात संरक्षित केले जाईल, अशी माहिती कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी दिली.
मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे म्हणाले, सध्याच्या काळातील इंधनाची वाढती गरज व त्यांच्या भरमसाठ किंमती यामुळे भारतातील युवा संशोधकांनी सौर ऊर्जेचे रूपांतरण करण्यासाठी नवनवीन साधने कशी तयार करता येतील यावरती भर द्यावा.
या संशोधनामध्ये मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे व यांच्यासमवेत संशोधक विद्यार्थी रणजित निकम, संभाजी खोत, डॉ . प्रीती बागवडे आणि दिलीप पाटील यांचा सहभाग होता. पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाला सौर ऊर्जा रूपांतरणासाठी पेटंट
|