बातम्या

डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. सी.डी. लोखंडे अव्वल जागतिक संशोधकांच्या यादीत

D Y Patil University Dr CD Iron  In the list of top world researchers


By Administrator - 9/18/2024 10:08:23 PM
Share This News:



कसबा बावडा/ वार्ताहर अमेरीकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जागतिक पातळीवरील आघाडीच्या संशोधकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे रिसर्च डायरेक्टर आणि डीन प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांनी जगातील अव्वल 2 टक्के संशोधकांमध्ये स्थान मिळवले आहे. डॉ. लोखंडे यांच्या या यशामुळे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

 अलाईड फिजिक्स  विभागातील ख्यातनाम संशोधक म्हणून ओळख असलेल्या डॉ. सी. डी. लोखंडे यांनी संशोधन क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. डॉ. लोखंडे यांचे आतापर्यंत ६५० रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत.  अलाईड फिजिक्समधी अव्वल संशोधकांच्या यादीत त्यांनी देशातील पहिले स्थान कायम राखले असून जागतिक पातळीवर  १८६ वा क्रमांक प्राप्त केला आहे.

     पदार्थ विज्ञानातील तत्वांचा वापर करून प्रत्यक्ष व्यवहारातील प्रश्न सोडविणे तसेच तांत्रिक सुधारणा करणे व नवनवीन उपकरणे तयार करण्यासाठी डॉ. लोखंडे हे सातत्यपूर्ण संशोधन करत आहेत. गॅस सेन्सॉर, सुपरकॅपॅसिटर, पाण्याचे विघटन, सौर घट, उर्जा साठवणूक पद्धत आदी विषयात त्यांनी केलेल्या संशोधनामुळे ८०  हून अधिक पेटंट प्राप्त झाली आहेत.  त्यांच्या संशोधन कार्याबद्दल त्यांना यापूर्वी अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. भारत सरकारच्या पेटंट विभागासाठी वैज्ञानिक सल्लागार तसेच बनारस विश्व विद्यालयाच्या सर्वोच्च मंडळावर राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून सदस्यपदी त्यांनी काम केले आहे.

    डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी.  पाटील यांनी  या यशाबद्दल प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे यांचे अभिनंदन केले आहे. डॉ.  लोखंडे यांचे यश अतिशय कौतुकास्पद व अभिमानास्पद असून त्यांनी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे नाव जागतिक पातळीवर उंचावले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात अनेक संशोधक घडत आहेत. संशोधन क्षेत्रात विद्यापीठाचे योगदान आणखी वाढावे यासाठी आमचे प्रयत्न  सुरूच राहतील, अशी ग्वाही डॉ. पाटील यांनी दिली. 

   डी. वाय. पाटील एज्यूकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष गृहराज्यमंत्री सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. राकेश कुमार शर्मा  यांनी जागातिक अव्वल संशोधकांच्या यादीत स्थान मिळवल्याबद्दल डॉ. सी. डी. लोखंडे यांचे अभिनंदन केले.


डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. सी.डी. लोखंडे अव्वल जागतिक संशोधकांच्या यादीत