बातम्या
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा इटलीत ‘इटालियन टेक्नॉलॉजी ॲवॉर्ड’ ने सन्मान
By nisha patil - 6/14/2023 4:32:59 PM
Share This News:
इचलकरंजी : प्रतिनिधी येथील डीकेटीई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मयुर जैन, साक्षी शहा व निखील उपाध्ये या विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या इटालियन टेक्नॉलॉजीवरील संशोधनासाठी त्यांना द असोसिएशन ऑफ इटालियन टेक्स्टाईल मशिनरी मॅन्युफॅक्चर्स (ऍसिमेट), इटालियन मिनिस्ट्री फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट व इटालियन ट्रेड एजन्सी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इटालियन टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी २०२३‘ या ॲवार्डने इटली येथे सन्मानित करण्यात आले.
इटली येथील या उत्कृष्ट संशोधन सोहळयास जगभरातून निवडलेल्या पुरस्कारांमध्ये भारतातून डीकेटीईच्या तीन विद्यार्थ्यांचा समावेश होता याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मयुर जैन याने प्रा.डॉ.यु. जे. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इवॅल्युएशन ऑफ निटेड फॅब्रीक्स रेनफोर्सड कम्पोसिटस’ या विषयावर उत्कृष्टरित्या संशोधनात्मक प्रकल्प पूर्ण केला तर साक्षी शहा हीने प्रा.डॉ व्ही.के.ढंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट ऑफ पोस्ट सर्जरी ब्रिस्ट कॅन्सर पेशन्टस’ या विषयावर संशोधन केले तर निखील उपाध्ये यांनी प्रा. डॉ. एस.एम. लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अल्ट्रॉसॉनिक असिस्टेड लिचिंग ऑफ इंडिगो‘ या विषयावर संशोधन प्रकल्प पूर्ण केला. विद्यार्थ्यांनी डीकेटीईमध्ये उपलब्ध असलेले इटालियन मशिनरीवर सखोल अभ्यास करुन संशोधनात्मक प्रकल्प पूर्ण केला. निवड अधिकारीकडून सविस्तर पडताळणी झाली व त्यांना इटलीला जाण्याचा बहुमान मिळाला. या आधीही डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना इटालियन टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी ऍवॉर्ड प्राप्त झाला आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक कालावधीमध्ये परदेशी अभ्यास दौरा करण्याची सुसंधी प्राप्त झाल्यामुळे पालक वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
ऍसीमेट ही संस्था इटलीमधील वस्त्रोद्योगातील अत्याधुनिक यंत्रसामुग्री उत्पादित करणा-या उत्पादकांची शिखर संस्था आहे. ही संस्था इटालियन मिनिस्ट्री फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट व इटालियन ट्रेड एजन्सी यांच्यावतीने विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी जागतिक पातळीवरील विद्यार्थ्यांसाठी संशोधन स्पर्धा आयोजित करते. यासाठी जगातील विविध टेक्स्टाईल कॉलेजमधून अर्ज मागविण्यात येतात. यामध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व यशाचे शिखर गाठले.
प्रा. डॉ. यु. जे. पाटील, प्रा. एस.बी. अकिवाटे, प्रा. आर. एच. देशपांडे, प्रा.राजन्ना गोटीपामूल हे या विद्यार्थ्यांसोबत इटलीस गेले होते. विद्यार्थ्यांचा इटलीचा ये-जा चा सर्व खर्च, राहण्याचा व इतर खर्च इटालियन ट्रेड एजन्सीने केला होता. इटली येथे आयोजित पुरस्कार सोहळयामध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांना डॉ ऍलेसॅन्ड्रो झुची, प्रेसिडेंट ऑफ ऍसीमेट, इटली यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध लेक्चर्स आणि प्रेझेंटेशन्स बरोबरच इटली येथील विविध इंडस्ट्रीजना भेटी दिल्या.
यशस्वी विद्यार्थ्यांचे डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आण्णा आवाडे, ट्रेझरर प्रकाश दत्तवाडे, सचिव डॉ.सौ.सपना आवाडे व सर्व विश्वस्त, प्र. संचालिका प्रा.डॉ.सौ. एल.एस.आडमुठे, उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील यांनी अभिनंदन केलेे.
डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा इटलीत ‘इटालियन टेक्नॉलॉजी ॲवॉर्ड’ ने सन्मान
|