शैक्षणिक
डीकेटीईच्या इटीसी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत यश
By nisha patil - 12/3/2025 7:09:02 PM
Share This News:
डीकेटीईच्या इटीसी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत यश
इचलकरंजी, १२ मार्च २०२५: डीकेटीई सोसायटीच्या इटीसी इंजिनिअरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील आयडीई बूटकॅम्प स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. मध्यप्रदेशमधील ज्ञानगंगा इन्स्टिट्यूट, जबलपूर येथे झालेल्या या स्पर्धेत स्मार्ट कॉलर प्रकल्पाला मानांकन मिळाले.
या स्पर्धेत देशभरातील १०० हून अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील ६०० हून अधिक गट सहभागी झाले होते. डीकेटीईच्या पूर्वा कुलकर्णी, सम्राज्ञी माने, अद्वैत कुलकर्णी, तनिष कुलकर्णी आणि अवधूत महाजन या विद्यार्थ्यांनी डॉ. जे.पी. खरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारला.
स्मार्ट कॉलर प्रकल्प हा गायींच्या आरोग्य व्यवस्थापनावर आधारित असून IoT (इंटरनेट ऑफ थिंग्स) तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आला आहे. या कॉलरमध्ये विविध सेन्सर्स बसवण्यात आले असून, ते गायींच्या हालचाली, तापमान, आहार आणि आरोग्यविषयक माहिती नोंदवतात. ही माहिती विश्लेषित करून मोबाईल अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळेवर सूचना दिल्या जातात, त्यामुळे गायींचे आरोग्य सुधारून दूध उत्पादन वाढण्यास मदत होते.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे आणि सर्व विश्वस्तांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ. एल.एस. अडमुठे, इटीसी विभागप्रमुख डॉ. एस.ए. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डीकेटीईच्या इटीसी इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत यश
|