बातम्या

महानगरपालिका क्षेत्रात संविधान दालनाची उभारणी करण्याची मागणी

Demand for construction of constitution hall in municipal area


By nisha patil - 6/24/2023 9:47:17 AM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी  येथील संविधान परिवारच्यावतीने इचलकरंजी  महानगरपालिका क्षेत्रात संविधान दालनाची उभारणी करावी अशी मागणी महापालिकेचे उपायुक्त डॉ.प्रदीप ठेंगल यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निवेदनात म्हटले आहे की ,२३ मार्च २०२३ रोजी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्याशी सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये 
 लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्राच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान एक संविधान दालन उभारण्यासंबंधी विषय मांडला होता. संविधान विषयी प्रबोधनाचे महत्त्व आणि आवश्यकता लक्षात घेऊन त्यांनी या विषयाला मान्यता देऊन हे लवकरात लवकर करूया असे आश्वासित केले होते. अशा संविधान दालनात लावण्याच्या पोस्टर्सचा सर्व आराखडा त्यांना दाखवण्यात आला होता.याच अनुषंगाने 
 इचलकरंजी शहरातील शाहू हायस्कूलमध्ये असे पहिले संविधान दालन व्हावे अशी मागणी संविधान परिवारच्यावतीने महापालिकेचे 
उपायुक्त डॉ प्रदीप ठेंगल यांच्याकडे केली.
तसेच 'हर घर तिरंगा' अंतर्गत परिपत्रकामध्ये संविधान स्तंभ उभे करण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या. त्या पद्धतीच्या उभारणीसाठी महानगरपालिका इमारत परिसरात किंवा राधाकृष्ण चित्रपटगृहाजवळील चौकात अशा प्रकारचा संविधान स्तंभ येत्या काळात उभा करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी 
राष्ट्र सेवा दलाचे संघटक रोहित दळवी, युवती संघटक स्नेहल माळी, अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक अशोक वरुटे, सचिव वैभवी आढाव, संविधान प्रचारक प्रशांत खांडेकर, आदित्य धनवडे, ऋतिक बनसोडे आदींसह  संविधान परिवारचे सदस्य उपस्थित होते.


महानगरपालिका क्षेत्रात संविधान दालनाची उभारणी करण्याची मागणी