बातम्या
धोकादायक असलेल्या काळम्मावाडी धरणाची दुरुस्तीसाठी आमदार पी एन पाटील यांच्याकडून निधीची मागणी
By nisha patil - 7/25/2023 6:42:35 PM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरणाच्या भिंतीतील पाणी गळती काढण्याच्या नावाखाली गेल्यावर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला होता. त्याचा कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला फटका बसला. या धरणाला गळती लागल्यामुळे धरण धोक्यात असून दुरुस्तीसाठी तातडीने निधी द्यावा, अशी मागणी आमदार पी.एन. पाटील यांनी आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबीची गांभीर्याने नोंद घेऊन तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.काळम्मावाडी धरणाची पाणी साठवण क्षमता 28 टीएमसी असून या धरणाच्या मुख्य भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे. पाटबंधारे विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी प्रतिसेकंद 650 लिटर्स पाणी गळती होते. ही गळती एक वर्षात काढणार असून 84 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे आणि निविदा काढणार आहे, असे सांगून काही अधिकाऱ्यांनी तीस टक्के पाणीसाठा कमी केला होता. मात्र, पावसाला उशीर झाल्याने ऐन उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले होते. जनतेला प्यायलाही पाणी मिळणार नाही अशी स्थिती निर्माण झाली होती.
मात्र, गेल्या वर्षभरात या कामावर एक रुपयाही खर्च झालेला नाही. शाहू जयंती दिवशी झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत पाणीटंचाई का निर्माण झाली.असा प्रश्न उपस्थित केला असता या कामासाठी टेंडरच मंजूर झाले नसून 84 कोटींचे पुन्हा टेंडर काढणार असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, त्यासाठी पुन्हा या वर्षी 30 टक्के पाणीसाठा कमी केला जाणार आहे, त्यामुळे पुन्हा यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण होणार आहे.
धोकादायक असलेल्या काळम्मावाडी धरणाची दुरुस्तीसाठी आमदार पी एन पाटील यांच्याकडून निधीची मागणी
|