बातम्या
यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ अंमलबजावणीची मागणी - आमदार प्रकाश आवाडे
By nisha patil - 10/10/2024 2:49:25 PM
Share This News:
कुंभोज प्रतिनिधी: विनोद शिंगे राज्यातील यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी केली आहे. त्यांच्या मागणीनुसार कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी वस्त्रोद्योग सचिवांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे यंत्रमाग कामगारांच्या कल्याणकारी मंडळाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील 55 ते 60 टक्के यंत्रमाग विकेंद्रीत क्षेत्रात आहेत, जे देशातील कापड उत्पादनाच्या 62 टक्के उत्पादनासाठी जबाबदार आहेत. या उद्योगातील कामगारांच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. आमदार प्रकाश आवाडे यांनीही यासाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला आहे.
बांधकाम कामगार मंडळाच्या धर्तीवरच यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ चालविण्यात येणार आहे. या मंडळासाठी प्रतिकिलो सूतावर सेस आकारणी करून जमा झालेल्या निधीतून यंत्रमाग कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सहमतीने या मंडळाच्या स्थापनेसाठी मंजुरी देण्यात आली आहे.
या प्रस्तावाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रीमंडळासमोर हा प्रस्ताव मांडण्याचे आवाहन आमदार आवाडे यांनी केले आहे. कामगार मंत्री सुरेश खाडे यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत वस्त्रोद्योग सचिवांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
यंत्रमाग कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ अंमलबजावणीची मागणी - आमदार प्रकाश आवाडे
|