बातम्या
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी: शेतकऱ्यांचे कर्जमाफी व ऊसाची किमती वाढविण्याची मागणी
By nisha patil - 1/1/2025 2:36:48 PM
Share This News:
कोल्हापूर ( प्रतिनिधी) विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पुर्तता राज्य सरकारने तातडीने करावे व गतवर्षी तुटलेल्या उसास दुसरा हप्ता २०० रूपये व चालू वर्षीच्या तुटणा-या ऊसाला ३७०० रूपयाची पहिली उचल देण्यासंदर्भात कारखानदार व संघटनांची तातडीने बैठक लावण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेकडे करण्यात आली.
मागील ५ वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी रसातळाला गेला आहे. त्यातच सोयाबिन, कापूस, तूर, दूध, साखर, डाळी आदींच्या पडलेल्या दरामुळे शेतकरी मातीमोल झालेला आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीत शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकावा लागत आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे. डी.ए.पी. मध्ये पुन्हा २५० रूपयांची वाढ झालेली आहे. किटनाशके, तणनाशकांच्या किंमतीत मोठी वाढ झालेली आहे.
सरकार हमीभाव जाहीर करते. पण हमीभावाचा कायदा अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतीमाल विकावा लागत आहे. परिणामी गेल्या ५ वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज हे दुप्पट झालेले आहे. एका बाजूला केंद्र सरकार देशातील कार्पोरट कंपन्यांचे १० लाख कोटींच्या कर्जाचा निर्णय घेत ते कर्ज राईट ऑफ करत आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट होते हे अतिशय दुर्देवी गोष्ट आहे. महायुती सरकारला शेतकऱ्यांनी भरभरून मते दिलेली आहेत. राज्य सरकारने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपला दिलेला शब्द पाळून संपुर्ण कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार , स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील , जिल्हा उपाध्यक्ष राजाराम देसाई , जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील ,विक्रम पाटील ,सचिन शिंदे , कोल्हापूर शहराध्यक्ष संदीप चौगुले , सुरेश म्हाऊंटकर ,तानाजी मगदूम , नामदेव भराडे, बसगोंडा बिराजदार , विशाल चौगुले यांचेसह कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानीचे पदाधिकारी ऊपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी: शेतकऱ्यांचे कर्जमाफी व ऊसाची किमती वाढविण्याची मागणी
|