गजानन महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान
By nisha patil - 5/26/2023 5:23:14 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम : बुलढाणा जिल्ह्यातील शेगावनगरीत उत्साहाचे टाळ वाजतायत आणि मृदुंगातून सात्विकता पाझरू लागली हे. बच्चा कंपनीपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच राम कृष्ण हरी या मंत्राने भुरळ घातली आहे. कारण आहे गजानन महाराजांच्या पालखी प्रस्थानाचं. आज संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. यासाठी संस्थानातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. डोईवर तुळशी वृंदावन घेतलेल्या विठोबाच्या लेकी, डोक्यावर शुभ्र टोपी, हाती वैष्णवाची पताका, गळ्यात टाळ, कपाळी अबीर आणि चंदनाचा टिळा लावलेले ज्ञानोबा-तुकोबांचे पाईक आणि मुखी विठ्ठलाचे नाम… असं सगळं विठ्ठलमय वातावरण ठायी ठायी दिसणार आहे. सर्व वारकऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. आजपासून गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने मजल-दरमजल करत पुढे पुढे सरकत राहणार आहे. गजानन महाराजांच्या पालखीचं यंदा 54 वं वर्ष आहे. सुमारे 30 दिवसांत, तब्बल साडेपाचशे किलोमीटरची वाट तुडवत विठ्ठलभक्त गजानन महाराजांच्या सोबतीने पंढरपूरकडे निघणार आहेत. 27 जून रोजी ही पालखी पंढरपुरात पोहोचेल आणि आषाढीला गजानन महाराज विठ्ठलाची गळाभेट घेतील. शेगावातून प्रस्थान ठेवणाऱ्या संत गजानन महाराजांच्या पालखी मार्गावरील वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे. पालखी मार्गावर दरवर्षी भाविकांची अलोट गर्दी होते, हे लक्षात घेता चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. गर्दी अधिक वाढली तर गरज पडल्यास पालखीच्या मार्गाबाबत पोलीस प्रशासन निर्णय घेऊ शकते. आषाढी वारीसाठी दरवर्षी महाराष्ट्रातून 43 पालख्या पंढरपुरात दाखल होतात. या पालख्यांमध्ये तुकोबारायांची पालखी, माऊलींची पालखी, गजानन महाराजांची पालखी, सोपानकाकांची पालखी, मुक्ताईंची पालखी या पालख्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरतात.
गजानन महाराजांच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थानspeednewslive24#
|