बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

Deputy Chief Minister Ajit Pawar inspected the development works in Baramati


By nisha patil - 8/27/2023 1:04:34 PM
Share This News:



बारामती, दि. २७ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती परिसरातील विविध विकास  कामांची  पाहणी  करून  अधिकाऱ्यांना  कामे  गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

विकास  कामांची  पाहणी  करतांना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत माहिती घेतली. कन्हेरी वनोद्यांनाची कामे दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे. सार्वजनिक विकासकामे करतांना गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे.   कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 

वयोवृद्ध नागरिक, लहान मुलांच्या सोईच्यादृष्टीने बैठक व्यवस्था करावी. पावसाळ्यामध्ये रस्ते आणि पायऱ्यांवरुन पाण्याचा व्यवस्थितपणे निचरा होईल अशी रचना असावी. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे. नवीन विकास कामाबाबत प्रस्ताव तातडीने सादर करावेत, असे निर्देश श्री.पवार दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यासोबत जवारबाग ते परकाळे बंगला आणि गरुडबाग ते जलतरण तलाव व गरुडबाग ते बाल विकास मंदिर येथील कॅनॉलचे सुशोभिकरणाची कामे, श्रीमंत बाबुजी नाईक वाडा व नदी घाट परिसर आदी कामांची पाहणी केली. 

यावेळी अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार गणेश शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहिर, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते,  पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे संचालक सचिन सातव आदी उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी