बातम्या

मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का वापरल्याची बाब गंभीर, प्रकरणाची गंभीर दखल, कोणालाही पाठिशी घालणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Deputy Chief Minister Ajit Pawars testimony in the Legislative Assembly


By nisha patil - 2/29/2024 4:20:15 PM
Share This News:



मुंबई, दि. २९ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून त्याची राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरु आहे. याप्रकरणात कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसेभत दिली.
 
उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट सही आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याचे मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना आढळून आले आहे. ही बाब गंभीर असून तेवढ्याच गंभीरपणे राज्य सरकारने त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामागे कोण आहे याचा तपास सुरु आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता.


मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का वापरल्याची बाब गंभीर, प्रकरणाची गंभीर दखल, कोणालाही पाठिशी घालणार नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही